पुणे : नांदगाव (ता. दौंड) येथील उसाच्या शेतात शिकारीसाठी लावलेल्या लोखंडी सापळ्यात अडकलेल्या बिबट्याच्या मादीची पुणे वन विभाग आणि रेस्क्यू चॅरिटेबलच्या संयुक्त प्रयत्नांतून यशस्वी सुटका करण्यात आली. या मादीवर सध्या बावधन येथील वाइल्डलाइफ ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर येथे सखोल वैद्यकीय उपचार सुरू आहेत. गेल्या तीन वर्षांत दौंड परिसरात बिबट्याच्या अशा प्रकारे सापळ्यात अडकण्याची ही तिसरी घटना असून, या प्रकारामुळे अवैध आणि धोकादायक सापळ्यांचा वापर अजूनही सुरू असल्याबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे.
उसाच्या शेतात शिकारीसाठी लावलेल्या लोखंडी सापळ्यात बिबट्याची मादी अडकली असल्याचे नांदगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अनिकेत शिंदे यांच्या सकाळी दहा वाजता ध्यानात आले. त्यांनी तत्काळ दौंड क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांना कळविल्यानंतर वन विभाग आणि रेस्क्यू ट्रस्टचे स्थानिक सदस्य घटनास्थळी पोहोचले. पुण्याहून रेस्क्यू ट्रस्टचे ‘रॅपिड रिस्पाॅन्स युनिट’ दुपारी साडेबारा वाजता घटनास्थळी दाखल झाले.
सुमारे सहा वर्षे वयाची ही बिबट्याची मादी आपल्या पुढच्या डाव्या पायात घट्ट अडकलेल्या लोखंडी सापळ्यात सापडली होती. रात्रभरच्या धडपडीमुळे ती खूप थकलेली दिसत होती. बिबट्याला दुपारी सव्वाच्या सुमारास भूल देऊन सुरक्षितपणे सापळ्यातून मुक्त करण्यात आले आणि लगेचच प्राथमिक वैद्यकीय उपचार करण्यात आले. रेस्क्यूच्या वरिष्ठ पशुवैद्यक डॉ. कल्याणी ठाकूर यांनी घटनास्थळी वैद्यकीय उपचारांचे नेतृत्व केले.
रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे वन्यजीव व्यवस्थापन संचालक तुहिन सतारकर म्हणाले, ‘या बचाव मोहिमेवरून समन्वित प्रतिसादाचे महत्त्व अधोरेखित होते. ग्रामपंचायतीकडून मिळालेली माहिती, वन विभागाचे त्वरित पाऊल आणि आमच्या कार्यकर्त्यांचा समन्वय यामुळे बिबट्याला वेळेवर मदत करता आली.’
या बचाव मोहिमेमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, फौजदार योगिता वीर, वनरक्षक सोनल चव्हाण यांच्यासह रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे तुहिन सातारकर, अमित तोडकर, नचिकेत अवधानी, श्रेयस कांबळे, अभिलाष बनसोड, डॉ. कल्याणी ठाकूर, सागर शिंदे, प्रज्वल गायकवाड हे सदस्य, तसेच शिरूर येथील गोविंद शेलार यांनी सहभाग घेतला.
बिबट्याच्या मादीचा पाय खूप घट्ट अडकलेला होता. मोठ्या प्रमाणात सूज आणि जखम दिसून आली. तिला पुण्यातील बावधन येथील वाइल्डलाइफ ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे. तेथे तिच्यावर सध्या बारकाईने वैद्यकीय निरीक्षण सुरू आहे. पुढील तपासणीसाठी एक्स-रे केले जातील. – डॉ. कल्याणी ठाकूर, वरिष्ठ पशुवैद्यक, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट
अशा प्रकारचे लोखंडी सापळे अमानवी असून, वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ नुसार पूर्णतः बेकायदा आहेत. स्थानिकांनी असे प्रकार लक्षात येताच तत्काळ वन विभागाला कळवावे, जेणेकरून कठोर कारवाई करता येईल. या घटनेची अधिकृत चौकशी सुरू असून, या प्रकरणात दोषी असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. – महादेव मोहिते, उपवनसंरक्षक, पुणे वन विभाग