पेट्रोल पंप एजन्सी मिळवून देण्याच्या आमिषाने एका व्यावसायिकाची ४२ लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत हिंजवडी भागातील एका व्यावसायिकाने चतु:शृंगी पोलीस फिर्याद दिली आहे. या प्रकरणी इरफान अमजअली (रा. पश्चिम बंगाल), शर्मिला कुमारी (रा. बिहार), रिना कुमारी (रा. मुंबई ) यांच्यासह एका साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी एका संकेतस्थळावर पेट्रोल पंप वितरण व्यवस्था मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. व्यावसायिकाने संकेतस्थळावरील जाहिरातीत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना आमिष दाखवून वेळोवेळी ४२ लाख रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली.

चोरट्यांच्या विरोधात फस‌वणूक तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून चतु:शृंगी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.