पुणे : गणेशोत्सवाच्या कालावधीत पुणे शहरात उपनगर आणि बाहेरगावांहून गणपती दर्शन आणि रोषणाई पाहण्यासाठी होणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत दोन टप्प्यांत बसच्या ७८८ फेऱ्या जादा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जादा बसेससाठी प्रचलित तिकीट दरापेक्षा दहा रुपये जादा आकारला जाणार असून, पासधारकांसाठी रात्री १२ वाजेपर्यंतच सेवा वैध राहणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

पहिल्या टप्प्यात २९, ३० ऑगस्ट आणि ५ सप्टेंबर या तीन दिवसांत १६८ जादा बस फेऱ्या, तर दुसऱ्या टप्प्यात ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर आणि ६ सप्टेंबर या कालावधीत ६२० जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. स्वारगेट ते निगडी या मार्गावर रात्रीच्या वेळी नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त विशेष जादा फेऱ्या असणार आहे, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.

पुण्यात गणेशोत्सवात भाविकांची गर्दी होत असते. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने गणेशोत्सव काळात गर्दीच्या ठिकाणी मागणीनुसार जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. या जादा बसेसाठी प्रचलित तिकीट दरापेक्षा दहा रुपये जादा दर आकारला जाणार आहे. पासधारकांसाठी रात्री १२ वाजेपर्यंतच सेवा वैध राहणार आहे. दरम्यान, गणेशोत्सव कालावधीत शहरातील शिवाजी रोड, बाजीराव रोड, लक्ष्मी रोड, टिळक रोड हे रस्ते सायंकाळी बंद राहतील. त्यामुळे या मार्गांवरील बस पर्यायी मार्गाने चालवल्या जाणार आहेत, असे पीएमपीचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी सांगितले.

स्थानक आणि जादा बसची संख्या

निगडी – ७०

चिंचवडगाव ३५

भोसरी ६२

पिंपळे गुरव २०

सांगवी १५

आकुर्डी रेल्वे स्टेशन १६

चिंचवड गाव मार्गे डांगे चौक – ३०

मुकाई चौक रावेत १२

चिखली/संभाजीनगर १०

एकूण – २७०