पुणे : मानाच्या पाच गणपती मंडळांच्या अगोदरच सकाळी सात वाजता लक्ष्मी रस्त्यावरून गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय शहरातील ६० सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी भूमिका जाहीर केली होती. त्यावरून राजकीय वातावरण तपासण्यास सुरुवात झाली होती. त्या प्रश्नावर स्थानिक लोकप्रतिनिधी एकत्रित बसून निश्चित तोडगा काढतील,अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे दौर्यावर असताना मांडली होती.
त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री आणि पुणे शहराचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली मानाचे पाच गणपती मंडळाचे अध्यक्ष आणि इतर मंडळांचे अध्यक्ष यांच्या सोबत शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली.
त्या बैठकीनंतर मुरलीधर मोहोळ म्हणाले की,शहरातील काही मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणुक सकाळी सात वाजता सुरू करण्यात यावी,अन्यथा आम्हाला सात वाजता मिरवणुक सुरू करू द्या, अशी मागणी मागील काही दिवसांपासून काही गणेश मंडळींनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज मानाचे पाच गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि इतर मंडळांची बैठक झाली. विविध मुद्यावर चांगल्या प्रकारे चर्चा झाली. त्या चर्चेअंती सकाळी ९:३० वाजता महात्मा फुले मंडई येथून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. तसेच प्रत्येक मंडळात एक ढोल ताशा पथक असणार,त्या पथकांमध्ये सदस्य संख्या देखील कमी असेल आणि मिरवणुक मार्गावर कुठे ही स्थिर वादन केले जाणार नाही. त्यामुळे वेळ वाचणार असून नेहमी प्रमाणे सर्व मंडळ मार्गस्थ होतील,अशी भूमिका त्यांनी मांडली.