पुणे : वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मानाच्या गणपती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यावरून सुरू असलेल्या मत-मतांतराबाबत समन्वयातून मार्ग काढण्यात येणार आहे. याबाबत विचारविनिमय करण्यासाठी मंगळवारी (५ ऑगस्ट) पोलीस आयुक्तालयात बैठकीचे आयोजन केले जाणार आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध मंडळांनी तयारी सुरू केली आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळा, दहा दिवसांचा उत्सव, तसेच विसर्जन मिरवणुकीबाबत कार्यकर्त्यांकडून नियोजन सुरू करण्यात आले आहे. विसर्जन मिरवणुकीत मानाची मंडळे मार्गस्थ झाल्यानंतर लगेचच मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय काही मंडळांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन मिरवणुकीपूर्वीच भूमिका जाहीर केली आहे. काही मंडळांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर मानाची मंडळे, तसेच मध्य भागातील प्रमुख मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी पोलीस आयुक्तालयात आयोजित करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणूक मार्ग, ढोल-ताशा पथके, वादक संख्या, पारंपरिक तसेच आधुनिक वाद्यांबाबत चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून गणेश मंडळांना संबंधित सूचना दिल्या जाणार आहेत.

एक खिडकी योजना

मंडळांसाठी यंदाही ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्यात येणार आहे. विविध प्रकारचे परवाने मंडळांना एक खिडकी योजनेद्वारे दिले जाणार आहेत. उत्सव कालावधीत मांडवाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे. भाविकांच्या सुरक्षेबाबत प्राधान्य देण्याच्या सूचना या बैठकीत केल्या जाणार आहेत. पोलीस आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

वैभवशाली परंपरा असलेला गणेशोत्सव शांततेत, तसेच सुरक्षित वातावरणात पार पडावा, त्यादृष्टीने पोलिसांकडून मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. मंडळाचे पदाधिकारी आणि पोलीस यांच्यात समन्वय साधण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. – अमितेशकुमार, पोलीस आयुक्त