तीन लाखांच्या खंडणीसाठी शिरूर तालुक्यातील डॉक्टरचे अपहरण करणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. आरोपी गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. वारजे माळवाडी परिसरात सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आले.

गौरव सुरेश बिरूंगीकर (वय २५, रा. रामनगर, वारजे माळवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वी बिरूंगीकर आणि त्याच्या साथीदारांनी तीन लाख रुपयांची खंडणी शिरुर परिसरातील एका डाॅक्टरकडे मागितली होती. त्यांनी डॉक्टरचे अपहरण केले होते. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दोघांना अटक केली होती. बिरुंगीकर आणि साथीदारांचा शोध घेण्यात येत होता. गेले सहा महिने बिरुंगीकर पोलिसांना गुंगारा देत होता. तो वारजे परिसरात येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर सापळा लावून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने खंडणीसाठी डाॅक्टरचे अपहरण केल्याची कबुली दिली.

त्याला शिरुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाटगे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, उपनिरीक्षक विकास जाधव, नितीन कांबळे, किरण ठवरे, अमोल आवाड, दुर्योधन गुरव, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण आदींनी ही कारवाई केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.