Ganesh Visarjan 2025 Updates पुणे : ब्रिटिशांविरोधात स्वातंत्र्याची लढाई व्यापक करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक केला. आता लढाई ब्रिटिशांशी नाही ; पण सामाजिक ऐक्यासमोर अनेक आव्हाने स्वातंत्र्योत्तर काळात सातत्याने नवनव्या स्वरूपात समोर येत आहेत. त्यामुळे लोकमान्यांना अभिप्रेत असलेला सार्वजनिक गणेशोत्सव एकोप्याचे प्रतीक व्हावा म्हणून कित्येक कार्यकर्ते झटतात. ही गोष्ट आहे, हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देत गणेश भक्तांना मोठ्या प्रेमाने अत्तर लावणाऱ्या बागवान चाचांची.

गेल्या पंचवीस वर्षांपासून युसूफ बागवान हे पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत आहेत. ते शांतता समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहत आहेत. गणरायाला निरोप देण्यासाठी आलेल्या गणेशभक्तांचे अत्तर लावून स्वागत करण्याची त्यांची खास पद्धत आहे. त्यामुळेच आजूबाजूच्या परिसरात अत्तरवाले चाचा म्हणून ते लोकप्रिय झाले. त्यांच्या अत्तर लावण्यात निरपेक्ष प्रेमाची भावना असते. त्यात जात, धर्म आणि टोकाच्या भावनांना थारा नसतो. केवळ वाऱ्याबरोबर वाहणारा सुगंध आणि चेहऱ्यावर समाधानाने फुलणारं हास्य एवढेच. बागवान चाचा सांगतात, ‘पुण्यातच लहानाचा मोठा झालो. त्यामुळे लहान वयातच गणेशोत्सवाचे आकर्षण होते. मोठ्या उत्साहाने गणरायाच्या आगमनाची तयारी करायची. दहा दिवस देखावे आणि कार्यक्रमामध्ये कसे व्यतीत व्हायचे कळायचेदेखील नाही.

शेवटी, विसर्जनाचा दिवस म्हणजे उत्साहाला उधाण यायचे. अंगात वेगळीच ऊर्जा असायची. आनंदाची संधी देणाऱ्या लाडक्या गणरायाला निरोप देताना अंतःकरण जड व्हायचे. मात्र, विसर्जन मिरवणूक ही तर पुण्याची शान, म्हणजे आपली मोठी जबाबदारीच असल्याचेही भान होते. हिंदू-मुस्लिम समाजात अनेक वेळा तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न व्हायचे; पण दोन्ही समाजांत प्रेम असणे या देशासाठीही गरजेचे आहे. त्यामुळे हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी गणेशोत्सव, विसर्जन मिरवणुकीच्या संधीचा वापर करायचा आणि आपल्या परीने त्यासाठी प्रयत्न करायचे. कित्येक वर्षांपासून हा नित्यक्रम झाला आहे. विसर्जन मिरवणुकीत श्रमलेल्या कार्यकर्त्यांना दर वर्षी मेजवानी दिली जाते. पुण्यातल्या हिंदू-मुस्लिम ऐक्याचे हे प्रतीकच आहे.’

‘गेल्या काही वर्षांत गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. त्याने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मोठा आनंद वाटतो. ही वाटचाल अशीच आणखी दिमाखात पुढे जाऊ दे, एवढीच गणरायाच्या चरणी प्रार्थना. आता आमच्या पुढच्या पिढीने या उपक्रमात सहभागी व्हावे आणि ही समतेची, हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा पुढे न्यावी,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.