पुणे : कोंढवा भागातील उंड्री येथील एका इमारतीतील बाराव्या मजल्यावर असलेल्या सदनिकेत शुक्रवारी आग लागली. सदनिकेत सिलिंडरचा स्फोट झाल्याने पंधरा वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. आग आटोक्यात आणणाऱ्या दोन जवानांसह पाच जण जखमी झाले.
कोंढवा-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर असलेल्या उंड्री भागात मार्वल आयडियल सोसायटी ही चौदा मजली इमारत आहे. इमारतीतील बाराव्या मजल्यावर असलेल्या सदनिकेत दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास आग लागली. आग भडकल्यााने मोठ्या प्रमाणावर धूर झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी रवाना झाले. इमारत उंच असल्याने अत्याधुनिक यंत्रणा असलेली शिडी घटनास्थळी पाठविण्यात आली. जवानांनी बाराव्या मजल्यावर पाईप नेले. त्या वेळी सदनिकेत अचानक स्फोट झाला. आग आटोक्यात आणणारे दोन जवान जखमी झाले, तसेच सदनिकेतील तीन रहिवासी गंभीर जखमी झाली. आगीत एका पंधरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाने दिली.
आग आटोक्यात आणण्यासाठी जवानांकडून सायंकाळपर्यंत प्रयत्न सुरू होते.