पुणे : चोरट्यांनी शहरातील वेगवेगळ्या भागांत सदनिकेचे कुलूप तोडून १८ लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. धायरी, लोहगाव, हडपसर भागात या घटना घडल्या.

सिंहगड रस्ता परिसरातील एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी आठ लाख ४६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एकाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार धायरीतील राजब्लिस सोसायटीत राहायला आहेत. ते २६ मे रोजी बाहेर गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील आठ लाख ४६ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. पोलीस उपनिरीक्षक संतोष कदम तपास करत आहेत.

हडपसरमधील मांजरी भागात घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सहा लाख २० हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मांजरीतील साईरामनगर भागात राहायला आहेत. २६ मे रोजी तक्रारदार आणि कुटुंबीय बाहेर गेले होते. चोरट्यांनी मध्यरात्री घराचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून ऐवज चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी तपास करत आहेत.

मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडी भागात एका घरातून चोरट्यांनी ५० हजारांचे तीन मोबाइल संच चोरून नेले. याबाबत एकाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोहगाव भागातील एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख २० हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांचे आवाहन

शाळांना सुटी असल्याने अनेक जण सहकुटुंब पर्यटनासाठी बाहेरगावी जातात. चोरटे बंद सदनिकांचे कुलूप तोडून ऐवज चोरून नेत असल्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांनी शेजारी, तसेच सोसायटीतील रखवालदाराला माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.