पुणे शहरातील कोथरूड भागात गुंड निलेश घायवळ टोळीतील पाच आरोपींनी एका तरुणावर गोळीबार आणि एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना चार दिवसापूर्वी घडली होती.त्या प्रकरणातील पाच आरोपींना अटक केली असून त्या सर्व आरोपींची पोलिसांनी धिंड काढली. गुंड निलेश घायवळ टोळीतील आरोपी मयूर कुंबरे,रोहित आखाडे, गणेश राऊत,मयंक उर्फ मॉन्टी व्यास, आनंद चांदलेकर उर्फ अंड्या हे पाच आरोपी आहेत.

कोथरूड भागामध्ये चार दिवसापूर्वी रात्री अकराच्या सुमारास रस्त्यावर गप्पा मारत थांबलेल्या तरुणाने दुचाकीला जाण्यास रस्ता दिला नाही. त्या कारणावरून वरील पाच आरोपींनी प्रकाश धुमाळ या तरुणासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी प्रकाश धुमाळ या तरुणावर गोळीबार केल्याची घटना घडली. त्या घटनेमध्ये प्रकाश धुमाळ यांच्या मांडीला गोळी लागली. त्यांना तात्काळ जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले.

तर त्यानंतर आरोपींनी वैभव साठे या तरुणावर देखील कोयत्याने वार केले. त्या तरुणाला देखील तात्काळ रूग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार करण्यात आले. या दोन्ही घटनामुळे शहरात एकच खळबळ उडाली.

तर या प्रकरणातील पाच आरोपींना पोलिसांना पकडण्यात यश आले असून या सर्व आरोपींची कोथरूड भागात पोलिसांनी धिंड काढली.