पुणे : राष्ट्रीय पातळीवरील ‘पुणे ग्रँड चॅलेंज २०२६’ ही सायकल स्पर्धा जानेवारी २०२६ मध्ये होणार आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातून या स्पर्धेचा मार्ग जात असल्याने पुणे शहरातील ५५ किलोमीटर, तर पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील २० किलोमीटर अशा एकूण ७५ किलोमीटर मार्गांचे नूतनीकरण केले जाणार आहे. यासाठी या मार्गावरील २०० गतिरोधक, ४०० चेंबरची दुरुस्ती आणि या रस्त्यांचे सुशोभीकरण केले जाणार आहे. त्यासाठी १४५ कोटी ७५ लाख ८० हजार रुपयांचा खर्चाचा अंदाज आहे.

महापालिकेचे पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘टूर दी फ्रान्सच्या धर्तीवर ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकल स्पर्धा आहे. स्पर्धेच्या मार्गावरील रस्ते डांबरीकरण, चेंबर दुरुस्ती, पादचारी मार्ग दुरुस्ती यासह अन्य सुधारणांसाठी महापालिकेच्या वतीने १४५ कोटी ७५ लाख ८० हजार रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. नोव्हेंबरअखेरपर्यंत आवश्यक ती सर्व कामे पूर्ण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न राहणार आहे. ही कामे चार टप्प्यांत विभागण्यात आली असून, पुढील दोन महिन्यांत कामे पूर्ण करण्यासाठीचे नियोजन महापालिकेने केले आहे.’

ही कामे करताना ज्या रस्त्यांवरून ही सायकल स्पर्धा जाणार आहे. तेथील रस्ते ठरावीक मानांकनांचे तयार केले जाणार आहेत. तसेच या मार्गावरील सायकलसाठी अडथळा आणि धोकादायक ठरणारे २०० गतिरोधक आणि ४०० ड्रेनेज चेंबरची दुरुस्ती करून त्यांची झाकणे बदलली जाणार आहेत.

देशात आंतरराष्ट्रीय सायकलिंग व क्रीडा पर्यटनाला वाव देण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (सीएफआय) यांच्यातर्फे जानेवारी २०२६ मध्ये ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या गुणवत्तेचे रस्ते तयार केले जाणार आहेत. ही कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी एका ठेकेदारास केवळ एकाच निविदेचे काम मिळविता येणार आहे. ज्या ठेकेदाराचा शहराच्या हद्दीपासून ३५ किलोमीटरच्या हद्दीत स्वतःचा हॉटमिक्स (डांबर) प्रकल्प आहे असे ठेकेदार यामध्ये पात्र ठरणार आहेत.

डांबरीकरणानंतर १२ तास रस्ते बंद

रस्त्यांचे डांबरीकरण केल्यानंतर त्यावरून लगेच वाहतूक सुरू केली जाणार नाही. सायकल स्पर्धेसाठी हा रस्ता व्यवस्थित राहावा, यासाठी डांबरीकरण झाल्यानंतर किमान १२ तास रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यासाठी पथ विभागाचा वाहतूक पोलीस व अन्य विभागांशी समन्वय असणार आहे. रस्त्याचा दर्जा चांगला राखला न गेल्यास त्याचा फटका सायकलपटूंना बसणार आहे. त्यामुळे डांबरीकरणानंतर रस्ता बंद ठेवला जाणार आहे. काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराने तेथे सेफ्टी इंजिनिअर, वॉर्डन यांची नियुक्ती करणे आवश्यक राहणार आहे.

ही कामे केली जाणार…

सायकल स्पर्धेचा मार्ग असलेल्या सर्व रस्त्यांचे रीसरफेसिंग आणि रस्त्याच्या खराब भागांची दुरुस्ती

धोकादायक गतिरोधक काढून ड्रेनेज चेंबरची दुरुस्ती करून रस्ते समतल केले जाणार

फूटपाथ आणि मध्यरेषांची दुरुस्ती, रंगरंगोटी

आंतरराष्ट्रीय मानकांनुसार रस्ते संकेतफलक (साइन बोर्ड) बसविणे.

सुरक्षिततेसाठी बॅरिकेड आणि रेलिंग बसविणे

शहर परिसरातील ७५ किलोमीटर मार्गाचे नूतनीकरण केले जाणार असून, या मार्गावरील २०० गतिरोधक आणि ४०० चेंबरची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यासाठी १४५ कोटी ७५ लाख रुपये खर्च येणार आहे.अनिरुद्ध पावसकर,विभागप्रमुख, पथ विभाग, पुणे महापालिका