पुणे : हडपसर भागातील रामटेकडी परिसरात टोळक्याने दहशत माजविल्याची घटना घडली. टोळक्याने शस्त्रे उगारून एका तरुणाला मारहाण केली, तसेच महिलांवर दगडफेक केली. दगडफेकीत दोन महिला जखमी झाल्या. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली.

महेश विकास शिंदे (वय २०, रा. रामटेकडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रेम उर्फ पिट्या थोरात (वय २१), दुर्वेश उर्फ बल्ल्या गायकवाड (वय १८), अरविंद उर्फ नक्या माने (वय १८), नितीन पाटोळे (वय १८), ओंकार देढे (वय २०), चेतन बावरी (वय १९, सर्व रा. रामटेकडी, हडपसर) यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळक्याने केलेल्या दगडफेकीत नीलावती सतीश देडगे (वय ५०), अनिता विश्वजित ठोसर (वय ३८) जखमी झाल्या आहेत. याबाबत संतोष छबुराव सुपेकर (वय ४५, रा. रामटेकडी, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष सुपेकर आणि त्यांचा पुतण्या गणेश सुपेकर (वय २२) हे शनिवारी (३१ मे) रात्री साडेअकराच्या सुमारास रामटेकडी परिसरात गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी आरोपी तेथे आले. त्यांच्याकडे कोयते होते. त्यांनी परिसरातील घरांवर दगडफेक केली. नागरिकांना शिवीगाळ केली. ‘आम्ही या भागातील भाई आहोत. तू प्राण्याबरोबर का फिरतो?’ अशी विचारणा करून शिवीगाळ केली, तसेच त्याच्यावर कोयता उगारून जिवे मारण्याची धमकी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपींनी कोयते उगारून दहशत माजविली. त्या वेळी नीलावती देडगे आणि अनिता ठोसर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी त्यांना दगड फेकून मारले. पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव तपास करत आहेत.