मुठा नदीकाठी नारायण पेठ पोलीस चौकीजवळ असलेले दोनशे वर्षांपूर्वीचे अष्टभुजा दुर्गादेवी मंदिर जुन्या पुण्याची साक्ष देणारी वास्तू आहे. पांढऱ्या शुभ्र संगमरवरी पाषाणातून घडविलेली महिषासुरमर्दिनी रूपातील अष्टभुजा दुर्गादेवी ही दैवज्ञ ब्राह्मण समाजाचे कुलदैवत आहे. पुणे महापालिकेच्या द्वितीय श्रेणी वारसा स्थळांच्या यादीत या मंदिराचा समावेश आहे.

नारायण पेठेतील अष्टभुजा दुर्गादेवी मंदिराची स्थापना चिंतामणशेठ दिवेकर यांनी १९ व्या शतकाच्या सुरुवातीस केली. या देवस्थानास पेशवे सरकार आणि श्री देवदेवेश्वर संस्थानाकडून दिवाबत्तीसाठी तनखा मिळतो. देवाचा यज्ञ करणारे ते दैवज्ञ ब्राह्मण अशी समाजाची ओळख झाली. सध्या पुण्यात स्थायिक झालेला हा समाज मूळचा कोकण आणि गोव्याच्या किनारी भागातील आहे. पूर्वी या समाजाकडे देवळांमधील देवांचे दागिने घडविण्याचे काम असे. ७० टक्के समाज हा सुवर्णकार व्यवसाय करणारा आहे, अशी माहिती १९०७ पासून या मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री अष्टभुजा दुर्गादेवी इस्टेट ट्रस्टचे माजी विश्वस्त उदय गडकरी यांनी दिली.

अष्टभुजा दुर्गादेवी मंदिराला गर्भगृह आणि प्रदक्षिणा मार्ग आहे. तसेच, एक बंदिस्त सभागृह आहे. त्या सभागृहाचे छत लाकडी असून, त्यावर कोरीव काम केलेले आहे. हे मंदिर दगड, लाकूड आणि विटांचा वापर करून तयार केले आहे. मंदिराची वास्तुशैली मिश्र स्वरूपाची आहे. नवरात्रोत्सवामध्ये मंदिरात कीर्तन, श्रीसूक्त पठण, अष्टमीला घागरी फुंकणे, नवचंडी होम, भाेंडला, विजयादशमीला देवीचा गाेंधळ यांसह दररोज महिला मंडळाचे भजनांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. कोजागरीला दुग्धपान आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम असतो.

अशी आहे देवीची मूर्ती

दुर्गेच्या अष्टभुजा अवतारात तिचे वाहन सिंह असून, तिला आठ हात आहेत. देवीच्या उजव्या हातांमध्ये शंख, धनुष्यबाण, कमळ, त्रिशूळ असून, डाव्या हातांमध्ये चक्र, तलवार, गदा आणि एक हात वरद मुद्रेमध्ये आहे. देवीच्या हातातील त्रिशूळ महिषासुराच्या शरीरात खुपसलेला असून, देवीचा उजवा पाय असुराच्या पाठीवर आहे.