पुणे : ‘हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्ग पूर्ण होण्यासाठी आणखी विलंब होणार असून, या प्रकल्पाला मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) दिला आहे. ‘राजभवन’च्या जागेचा ताबा मिळण्यास उशीर झाल्याने येथील कामासाठी विविध विभागांच्या परवानग्या आवश्यक आहेत.
‘पीएमआरडीए’कडून हाती घेण्यात आलेल्या २३.३ किलोमीटर अंतराच्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे ८५ टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. या मार्गावरील पूल बांधण्यात आले असून, लोहमार्ग (रुळ) देखील टाकण्यात आले आहेत. सद्य:स्थितीला २३ स्थानकांवरील सरकते जिने, वाहतूक नियंत्रण दिवे (सिग्नल), विद्युत यंत्रणा आणि इतर किरकोळ दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात असली, तरी या प्रकल्पातील ‘राजभवन’ची जागा सुरक्षेच्या कारणास्तव हस्तांतरित करण्यास नकार देण्यात आला होता.
अखेर फेब्रुवारी महिन्यात ही जागा देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. मात्र, ही जागा केवळ नावालाच हस्तांतरित करण्यात आली. या ठिकाणी काम करण्यास सुरक्षेच्या कारणास्तव नकार मिळत असून, परवानग्यांसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या ठिकाणी स्थानकाचे काम पूर्ण करून मेट्रोची चाचणी याच वर्षी घेण्याचा प्रयत्न असल्याचे ‘पीएमआरडीए’कडून सांगण्यात आले.
प्रकल्पाला यापूर्वीच उशीर
हिंजवडी परिसरात असणाऱ्या माहिती तंत्रज्ञान कंपन्या (आयटी पार्क) उद्योगधंदे आणि शिवाजीनगर दरम्यानची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग प्रकल्प हाती घेतला. सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) अंतर्गत हा मार्ग विकसित केला जात आहे. भूसंपादन, परवानग्या, निविदा आणि कार्यारंभ आदेश आदींमुळे प्रकल्पाला विलंब झालेला आहे.
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या मार्गादरम्यान येणाऱ्या राज भवनच्या जागेचा ताबा विलंबाने मिळाल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव विविध विभागांच्या परवानग्या रखडल्या आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून चाचणी, तांत्रिक त्रुटींची दुरुस्ती आदी प्रक्रिया पूर्ण करण्यास दहा महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडे मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत प्रस्ताव पाठवला. वित्त विभागाच्या मुख्य सचिवांनी याबाबत बैठक घेऊन मुदतवाढीसाठी सकारात्मकता दर्शवली आहे.– रिनाज पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.