पुणे : राज्यातील उद्योजकांना आंतरराष्ट्रीय व्यापार आणि निर्यातीची संधी मिळावी, यासाठी पाचव्या ‘पुणे इंटरनॅशनल बिझनेस समिट’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲड ॲग्रीकल्चर’च्या (एमसीसीआयए) वतीने आयोजित ही परिषद २६ व २७ फेब्रुवारीला होणार आहे. या परिषदेला १२ देशांचे वाणिज्य दूत उपस्थित राहणार आहेत.
याबाबत मराठा चेंबरचे अध्यक्ष दीपक करंदीकर आणि महासंचालक प्रशांत गिरबने यांनी मंगळवारी माहिती दिली. ही परिषद सेनापती बापट रस्त्यावरील एस.एल. किर्लोस्कर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (जे डब्लू मॅरिएट) येथे होणार आहे. यंदा परिषदेत वाहननिर्मिती, अन्न प्रक्रिया आणि सायबरसुरक्षा या उद्योगांवर भर देण्यात आला आहे. या परिषदेत अमेरिका, बेल्जियम, जर्मनी, फिनलंड, इस्राईल, इंडोनेशिया, पेरू, दक्षिण आफ्रिका, सिंगापूर, स्वित्झर्लंड, संयुक्त अरब अमिराती आणि झाम्बिया या देशांतील प्रतिनिधी हजेरी लावणार आहेत. राज्यातील लघु व मध्यम उद्योगांना या प्रतिनिधींशी चर्चा करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा…पुणे : लष्करी सरावादरम्यान कोथरुडमध्ये सदनिकेच्या खिडकीवर बंदुकीची गोळी
याचबरोबर परिषदेत आघाडीचे उद्योगपती मार्गदर्शन करणार आहेत. त्यात भारत फोर्जचे बाबा कल्याणी, केपीआयटी टेक्नॉलॉजीजचे रवी पंडित, फोर्ब्स मार्शलचे नौशाद फोर्ब्स, एमईसीएफचे प्रदीप भार्गवा, टाटा ऑटोकॉम्पचे अरविंद गोयल आणि पर्सिस्टंट सिस्टीम्सचे आनंद देशपांडे यांचा समावेश आहे. या परिषदेच्या माध्यमातून स्थानिक उद्योगांना जागतिक पातळीवरील व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधी यांची माहिती मिळणार आहे. लघु व मध्यम उद्योग, नवउद्यमी आणि महिला उद्योजिकांसाठी जागतिक पातळीवर व्यापाऱ्याच्या संधी मिळवून देण्याचा प्रयत्नही या निमित्ताने केला जाणार आहे.
पुणे इंटरनॅशनल बिझनेस समिटची वैशिष्टे
१२ देशांच्या वाणिज्य दूतांची उपस्थिती
आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योग प्रतिनिधींचा सहभाग
जागतिक व्यापार आणि गुंतवणूक संधींवर भर
निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने खास प्रयत्न
राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
अडीचशेहून अधिक प्रतिनिधींचा सहभाग