स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मध्यरात्री विशेष मोहिम (कोम्बिंग ऑपरेशन) राबवून गुंडांची झाडाझडती घेतली. पोलिसांनी शहरातील तीन हजार ३८१ गुंडांची तपासणी केली. त्यापैकी ५४७ गुंड राहत्या पत्त्यावर वास्तव्यास असल्याचे आढळून आले. गुंडांकडून पिस्तुल, काडतुसे, कोयते. तलवार असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.

गु्न्हे शाखेने पिस्तुल बाळगणाऱ्या दोन गुंडांना अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तुल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या सराईतांच्या विरोधात कारवाई करुन पोलिसांनी ३५ जणांना अटक केली. त्यांच्याकडून २९ कोयते, तलवार, पालघन, खंजीर, मोबाइल संच, दुचाकी असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. हडपसर भागात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील पसार आरोपी आकाश मोहन कांबळे (रा. फुरसुंगी) तसेच चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील पसार आरोपी जय विटकर, अनिल विटकर (रा. लाल चाळ, गोखलेनगर) यांना अटक करण्यात आली. खंडणी विरोधी पथकाने पिस्तुल बाळगल्या प्रकरणी आकाश अरुण पवार (रा. दत्तनगर, कात्रज) याला अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल आणि काडतुस जप्त करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी बेकायदा गावठी दारु विक्री प्रकरणी ११ जणांना अटक केली. त्यांच्याकडून गावठी दारु तसेच साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईत शहरातील हॅाटेल, लॅाजची तपासणी करण्यात आली. वाहतूक शाखेकडून संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. मुंबई प्रतिबंधक कायद्यान्वये १३ जणांना अटक करण्यात आली तसेच सराईतांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, नामदेव चव्हाण, रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाटगे, प्रियंका नारनवरे, सागर पाटील, पौर्णिमा गायकवाड, रोहिदास पवार, नम्रता पाटील, राहुल श्रीरामे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाण्यातील पथके विशेष मोहिमेत सहभागी झाले होते.