पुणे : ओडिसामधील जगन्नाथ पुरी रथयात्रेच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ म्हणजेच इस्कॉन पुणेच्या वतीने रविवारी (२९ जून) पुण्यात रथयात्रा काढण्यात येणार आहे. टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालय येथून दुपारी एक वाजता सुरू होणाऱ्या रथयात्रेमध्ये कात्रज-कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन मंदिरातील भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्तींचे रथावर दर्शन घडेल.

इस्कॉन संस्थेचे संन्यासी लोकनाथ स्वामी, मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार हेमंत रासने, सुनील कांबळे, योगेश टिळेकर यांच्या उपस्थितीत दुपारी एक वाजता आरती झाल्यानंतर रथयात्रेला प्रारंभ होईल.

पूरम चौक, बाजीराव रस्ता, शनिपार चौक, नगरकर तालीम चौक, लक्ष्मी रस्ता, उंबऱ्या गणपती चौक, रमणबाग शाळा, ओंकारेश्वर मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्ता मार्गे स. प. महाविद्यालय येथे रथयात्रेचा समारोप होणार आहे. सायंकाळी सात वाजता आरती, दर्शन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती इस्कॉन मंदिराचे प्रवक्ते जनार्दन चितोडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. रथयात्रेचे समन्वयक अनंतगोप प्रभू आणि प्रसाद कारखानीस या वेळी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.