पुणे : सराफी पेढीचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी ६५ लाखांचे चांदीचे दागिने, तसेच रोकड लांबविल्याची घटना गुरुवार पेठेतील फुलवाला चौकात घडली. मध्य भागातील सराफी पेढीत चोरीची घटना घडल्याने सराफ व्यावसायिकांमध्ये घबराट उडाली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सराफ व्यावसायिक विनोद परमार (वय ४१, रा. मुकुंदनगर, स्वारगेट) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार पेठेतील फुलवाला चौक परिसरात माणिक ज्वेलर्स सराफी पेढी आहे. परमार यांच्या पेढीत चांदीचे दागिने तयार केले जातात. मध्यरात्री चोरट्यांनी सराफी पेढीचा दरवाजा कटावणीने उचकटून आत प्रवेश केला.
चोरट्यांनी ४० लाख रुपयांचे ४५ किलो वजनाचे चांदीचे पैंजण, १३ लाख ५० हजार रुपयांचे १५ किलो वजनाचे चांदीचे कडे, चांदीच्या साखळ्या, नाणी, प्रतिमा, पाच लाखांची रोकड, तसेच सीसीटीव्ही चित्रीकरण साठविणारे डीव्हीआर यंत्र असा ६७ लाख ६० रुपयांचा मुद्देमाल लांबविला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अनुजा देशमाने, खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे तपास करत आहेत.
तीन पोत्यात चांदीचे दागिने भरून चोरटे पसार
चोरटे फुलवाला चौकातून मध्यरात्री चालत आले. सराफी पेढीत सुरक्षारक्षक नसल्याने चोरट्यांनी दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. चोरटे अर्धा तास सराफी पेढीत होते. चांदीचे दागिने पाेत्यात भरून चोरटे बाहेर पडले. सीसीटीव्ही चित्रीकरणात चोरटे आढळून आले आहेत. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. सराफी पेढीच्या समोरील इमारतीत पेढीत काम करणारे तीन कर्मचारी राहायला आहेत. सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास सराफी पेढीचा दरवाजा उघडा असल्याचे एका कर्मचाऱ्याने पाहिले. त्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.