पुणे : ज्योतिर्विद्या परिसंस्थेतर्फे येत्या रविवारी (७ सप्टेंबर) खग्रास चंद्रग्रहणानिमित्त आकाश दर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केसरीवाडा येथील वेधशाळेत रात्री ९.३० वाजल्यापासून मध्यरात्री १२:३० या वेळेत हा कार्यक्रम होणार असून, तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.

सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण हा महत्त्वाच्या वैज्ञानिक घटना आहेत. त्यातही सूर्यग्रहणाच्या तुलनेत चंद्रग्रहण जास्त वेळ चालते. त्यामुळे ग्रहणाची स्थिती जास्त वेळ पाहता येते. रविवारी होत असलेले चंद्रग्रहण भारतातून पाहता येणार आहे. त्या दिवशी लालसर रंगाचा चंद्र लक्ष वेधून घेणार आहे. ज्या वेळेस पृथ्वी, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते त्या वेळेस चंद्र पृथ्वीच्या सावलीतून जाताना तो संपूर्ण दिसेनासा न होता लालसर दिसत राहतो. त्यामुळे खग्रास चंद्रग्रहण जगभर ‘ब्लड मून’ नावाने ओळखले जाते.

त्यामुळे विज्ञानप्रेमी, विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी या चंद्रग्रहणाचे दृश्य पाहण्याची सोय करण्याचा पुढाकार ज्योतिर्विद्या परिसंस्थेने घेतला आहे. पुण्यातील केसरीवाडा येतील ज्योतिर्विद्या परिसंस्थेच्या वेधशाळेतून ग्रहण पाहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यात चंद्रग्रहण पाहण्यासाठी दुर्बीण लावण्यात येणार आहे. कार्यक्रमाला सर्वांना खुला प्रवेश मिळणार आहे.

७ सप्टेंबरच्या रात्री ८.५८ मिनिटांनी उपछाया ग्रहणाचा प्रारंभ होणार आहे. त्यानंतर रात्री ११ वाजता संमीलन, तर उपछाया ग्रहण समाप्ती पहाटे २.२५ वाजता होणार आहे. ही माहिती ज्योतिर्विद्या परिसंस्थेचे सचिव डॉ. सागर गोखले यांनी दिली. तसेच कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण youtube.com/JyotirvidyaParisanstha/live या दुव्याद्वारे पाहता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.