पुणे : ‘कात्रज येथील महापालिकेच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचा परिसर मोठा आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्याही लक्षणीय आहे. मात्र, त्या तुलनेत येथे असलेल्या प्राण्यांची संख्या कमी आहे,’ अशी कबुली महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
या प्राणिसंग्रहालयाला भेट देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची यामुळे निराशा होत असल्याचेही ते म्हणाले. महापालिका आयुक्त राम यांनी महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाला भेट देऊन तेथील सोयी-सुविधांची पाहणी केली. या पाहणीमध्ये आयुक्तांना येथे अनेक त्रुटी जाणवल्या. यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी उद्यान विभागासह प्राणी संग्रहालय प्रशासनाला दिल्या. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची तयारीदेखील दाखविण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना आयुक्त राम म्हणाले, ‘पुण्यासारख्या माेठ्या शहरात प्राणी संग्रहालयात अधिक प्राणी असायला हवेत. महापालिकेच्या कात्रज येथील प्राणी संग्रहालयात प्राण्यांची संख्या तुलनेत कमी आहे. यामध्ये वाढ करण्याची गरज आहे.
प्राणी संग्रहालयाचा परिसर १३० एकरामध्ये पसरलेला आहे. सर्वांत मोठे नैसर्गिक पाण्याचे तळे येथे आहे. येथील उपलब्ध जागेचा अधिक चांगल्या प्रकारे उपयाेग करून घेता येऊ शकताे. त्यासाठी काम केले पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी येथे आणायला हवेत. त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. येथे मनुष्यबळदेखील कमी आहे. प्राणी संग्रहालयात आवश्यक असलेल्या सर्व विषयांवर प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या असल्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
‘महापालिकेच्या प्राणी संग्रहालयाला भेट देणाऱ्या नागरिकांना वाहने लावण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याने अनेकदा रस्त्यावर वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षामध्ये काही बदल करून पर्यटक चांगल्या पद्धतीने कसे आकर्षित होतील, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
पुणे शहराची ओळख देशाच्या पातळीवर आहे. त्यामुळे येथील प्राणीसंग्रहालय देखील त्या पद्धतीने असले पाहिजे. यासाठी अधिकाधिक प्राणी आणण्याचा प्रयत्न यापुढील काळात महापालिकेचा असणार आहे. यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून दिला जाईल,’ असेही आयुक्त राम यांनी स्पष्ट केले.