पुणे : ‘नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्याासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या नदीपात्रातील खराडी ते शिवणे रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेले आहे. हे काम मार्गी लागल्यास वडगावशेरी भागातील वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे, महापालिकेने या रस्त्याचे काम पूर्ण करावे,’ अशी मागणी वडगावशेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी केली आहे.
महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह या रस्त्याची पाहणी गुरुवारी करण्यात आली. आमदार पठारे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या कनिज सुखरानी, सुरेंद्र पठारे यावेळी उपस्थित होते.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका हा रस्ता बजाविणार आहे. या रस्त्यासाठी पाच ठिकाणी भूसंपादन करावे लागणार आहे. संबधित जागामालकांशी चर्चा करून त्यांना मोबदला कसा पाहिजे, हे जाणून घेतले जाईल. – ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका.