पुणे : आर्थिक व्यवहारातून तामिळनाडूतील तरुणाचे अपहरण करणाऱ्या सहा जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. आरोपींच्या तावडीतून तरुणाची पोलिसांनी सुखरुप सुटका केली.

मोहमद फर्मान मेहेरबान (वय २७), अर्जुनकुमार शिवकुमार (वय २८, दोघे रा. नरुलापूर, बिजनौर, उत्तर प्रदेश), देवेंद्र सुनील अलभर (वय २५, रा. दैवदैठण, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर), अंकित अर्जुन अडागळे (वय २५, रा. पवई, मुंबई), प्रियांक देवेंद्र राणा (वय ३३, रा. आदर्शनगर, हरिद्वार, उत्तराखंड), अविनाश दत्तात्रय कदम (वय ४३, शिक्रापूर फाटा, ता. शिरुर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सुटका करण्यात आलेला तरुण मूळचा तामिळनाडूतील आहे. आरोपी त्याच्या ओळखीचे आहेत. आर्थिक व्यवहारातून त्यांच्यात वाद झाले होते.

हेही वाचा – ‘अभिनव’चे माजी प्राचार्य रावसाहेब गुरव यांचे निधन

आरोपींनी मुंबईत नोकरीच्या आमिषाने त्याला बोलावून घेतले. मुंबईतील एका कंपनीच्या परिसरातून त्याचे अपहरण करुन सोलापूर रस्त्यावरील एका लाॅजमध्ये त्याला डांबून ठेवले. त्यानंतर आरोपींनी त्याला मारहाण केली. तरुणाच्या कुटुंबीयांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून तीन लाख रुपयांची खंडणी मागितली. कुटुंबीयांनी आरोपींना तीन लाख रुपये पाठविले. त्यानंतर आरोपींनी त्याला डांबून ठेऊन मारहाण केली होती. त्याच्या कुटुंबीयांनी याबाबतची तक्रार पुणे पोलिसांकडे दिली. त्यानंतर गुन्हे शाखेने तपास सुरू केला. तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींना सोलापूर रस्त्यावरील एका लाॅजमधून अटक केली. त्यांच्या तावडीतून तरुणाची सुटका केली.

हेही वाचा – भविष्य निर्वाह कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की, शिवाजीनगर पोलिसांकडून व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली.