पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये एका अल्पवयीन मुलाने त्याच्या पोर्श गाडीखाली दोन तरुणांना चिरडले. या अपघातानंतर आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाला अवघ्या १४ तासांत जामीन मिळाला. याप्रकरणी समाज माध्यमातून टीका झाल्यानंतर पोलिसांनी आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, पुणे पोलीस ठाण्यातील आणखी एक धक्कादायक घटना समोर आली. अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात त्याला पिझ्झा देण्यात आला. तसंच, घटनेच्या ११ तासानंतरही त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले नव्हते, असा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला असल्याचं वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिलं आहे.

“पुण्यातील पब संस्कृती बंद झाली पाहिजे. कल्याणीनगर परिसरातील लोकांनी अनेकवेळा तक्रारी केल्या आहेत. पहाटे दीड वाजेपर्यंत पब सुरू न ठेवण्याची विनंती आम्ही केली होती”, असं पुण्याचे आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले. “या प्रकरणातील अल्पवयीन मुलावर आयपीसी कलम ३०२ (हत्येची शिक्षा) नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. याशिवाय, तो कार चालवताना मद्यधुंद अवस्थेत होता. याला गृह विभाग पूर्णपणे जबाबदार आहे. त्याला जामीन कसा मिळाला आणि त्याच्या वडिलांना तुरुंगात टाकायला हवे होते”, असंही ते म्हणाले. तसंच, येरवडा पोलीस ठाण्यात काल कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोपही धंगेकरांनी केला. त्या दिवशी सर्वांनी पोलिसांशी कोणाशी संपर्क साधला याचाही सविस्तर तपास करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, परिसरातील रहिवाशांनी पब संस्कृतीबाबत आपल्या तक्रारींचा पुनरुच्चार केला आहे.

हेही वाचा >> पुणे पोर्श गाडी अपघात प्रकरण : “आरोपीला वाचवण्यासाठी कोट्यवधींचा व्यवहार झाला”; रवींद्र धंगेकरांचा दावा; म्हणाले…

कल्याणी नगर येथील रहिवासी रचना अग्रवाल म्हणाल्या, “याला पब संस्कृती जबाबदार आहे. आम्ही पोलिस आयुक्तांना सूचित केले होते आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे भेटीची वेळ मागितली होती, परंतु कोणतेही नियम पाळले जात नसल्याने ते सर्व व्यर्थ गेले. आम्ही या पब आणि बारमुळे होणारी अवजड वाहतूक आणि ध्वनी प्रदूषणाचे प्रश्न अधिकाऱ्यांकडे मांडत आहोत, परंतु या सर्व गोष्टींचा सामना करत असतानाही तरुण लोक रात्रीच्या वेळी गोंधळ घालतात, ज्यामुळे रहिवाशांना खूप त्रास होतो.

अल्पवयीन मुलाच्या वडिलांना अटक

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, याप्रकरणातील आरोपी अल्पवयीन असल्याने सोमवारी त्याचे वडील विशाल अग्रवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तेव्हापासून ते फरार होते. पोलिसांकडून त्यांच्या शोध सुरू होता. यादरम्यान आज पहाटे त्यांना छत्रपती संभाजीनगर भागातून अटक करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रविवारी पहाटे झालेल्या या अपघातानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले होते. त्यानंतर रविवारी दुपारी त्याला विशेष हॉलिडे कोर्टात हजर केले होते. त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात यावी, अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती. तसंच आरोपी साडेसतरा वर्षांचा असल्याने त्याला प्रौढ समजून खटला चालवला जावा, अशी मागणीही करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली तसेच आरोपीला जामीन मंजूर केला होता.