पिंपरी-चिंचवड : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं नाव पुण्यातील कोंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी का आलं नाही, याचं उत्तर तपास अधिकारी आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल विभूते यांनी दिल आहे. ते पिंपरीत पत्रकारांशी बोलत होते.
कोंढवा येथील ४० एकर जमीन पार्थ पवार यांची ९९ टक्के भागीदारी असलेल्या अमेडिया कंपनीने अवघ्या ३०० करोडमध्ये विकत घेतली आहे. या प्रकरणात अवघा एक टक्का भागीदार असलेल्या दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवाणीसह इतर एकावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई झाल्यानंतर विरोधकांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये ९९ टक्के भागीदारी असलेले पार्थ पवार या प्रकरणातून सुखरूप का सुटले असा प्रश्न पडला आहे. पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही? अशी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
या सर्व प्रश्नांची उत्तरे तपास अधिकारी आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल विभूते यांनी दिली आहेत. ते म्हणाले, “गुन्हा दाखल करत असताना दस्त लिहून देणारा आणि लिहून घेणारा, त्याचबरोबर दस्त करताना हजर असलेल्या व्यक्तींवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामुळे पार्थ पवार यांच्या ९९ टक्के भागीदारी असण्याचा इथं संबंध नाही. तक्रार देण्यासाठी दुय्यम निबंधक यांची प्रक्रिया आहे.
फिर्यादीप्रमाणे आम्ही तक्रार घेतली आहे. त्या फिर्यादीप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केला आहे. पार्थ पवार यांचा सहभाग आहे की नाही याबाबत तपास सुरू आहे, यावर जास्त बोलणं योग्य नाही. ज्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्याबाबत कागदपत्रे तपासून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अटकेची प्रक्रिया केली जाईल. या प्रकणातील तपासासाठी विशेष पथक (SIT) नेमण्यात आले आहे.
