पुणे : ‘राजकारणी आपापल्या जाती-धर्मापुढे जाऊ इच्छित नाहीत, ही शोकांतिका असून, भटक्या विमुक्त समाजाची स्थिती आजही सुधारलेली नाही. आमचे आजचे जीवन भयानकच आहे. राजकारण्यांनी भटक्या-विमुक्त समाजाला जाणीवपूर्वक प्रस्थापित होऊ दिले नाही. त्यामुळे आजही आमचा समाज राज्यघटनेबाहेरच ठेवलेला आहे. अशा स्थितीत महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणायची लाज वाटते,’ अशी उद्विग्नता ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांनी मंगळवारी व्यक्त केली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात परिषदेचे अध्यक्ष डाॅ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते लक्ष्मण गायकवाड यांना मसाप जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी गायकवाड बोलत होते. सामाजिक कार्यकर्त्या गीताली वि. मं. यांना डाॅ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार, तर ज्येष्ठ लेखिका डाॅ. मंदा खांडगे यांना म. श्री. दीक्षित स्मृती मसाप स्नेहबंध पुरस्कार प्रदान करण्यात आला. परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, उपाध्यक्ष विद्याधर अनास्कर, राजीव बर्वे, कार्याध्यक्ष, प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.
‘जाती-धर्माचे राजकारण वाढवत नेऊन आमचा प्रवास सामाजिक एकात्मतेकडे न जाता उलट्या दिशेने सुरू आहे,’ अशी खंत व्यक्त करून गायकवाड म्हणाले, ‘जात-धर्म कालबाह्य होऊन समाजामध्ये बदल होईल, या आशेवर आम्ही जगत आहोत. देशाला बुद्धाच्या विचारांची गरज आहे. आमचे साहित्य करमणुकीसाठी नाही, तर सामाजिक परिस्थितीचे भान देण्यासाठी आहे. आमच्या यातनांची दखल घेऊन आम्हाला परिघाच्या आत घ्यावे, या उद्देशातून साहित्याची निर्मिती केली जात आहे.’
‘सत्ता माणसाला भ्रष्ट करते आणि त्यातून चांगला माणूस तयार होत नाही. चांगला माणूस घडविण्यासाठी स्त्रीवादाचे महत्त्व आहे. स्त्रीवादाची चळवळ पुरुष विरोधी नाही, तर पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्थेविरुद्ध आहे. स्वातंत्र्य, समता, मैत्रभाव आणि सामाजिक न्याय या चार तत्त्वांवर पुरुषपणाच्या संकल्पनेतून बाहेर पडत परिवर्तन घडले पाहिजे,’ असे गीताली वि. मं. यांनी सांगितले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा (जि. जळगाव) शाखेला राजा फडणीस पुरस्कृत फिरता करंडक, पलूस (जि. सांगली) शाखेला बाबुराव लाखे वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार, तर अहिल्यानगर येथील जयंत येलुलकर आणि तळेगाव दाभाडे येथील श्रीकृष्ण पुरंदरे यांना रत्नाकर कुलकर्णी स्मृती मसाप कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. अंजली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.