दरमहा पाच हजार रुपयांचा हप्ता तसेच फुकट दारू देण्यास नकार दिल्याने टोळक्याने मद्यालयाची तोडफोड केल्याची घटना एनडीए रस्त्यावर घडली. या प्रकरणी एका सराईतासह साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी गणेश शिंदे याच्यासह साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तुकाराम सोपान इंगळे (वय ५५, रा. इंगळे कॅार्नर, एनडीए रस्ता, शिवणे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इंगळे यांचा शिवणे परिसरात ॲपल रेस्टो बार आहे. शिंदे आणि साथीदार मद्यालयात आले होते. दरमहा पाच हजार रुपये तसेच फुकट दारू देण्याची मागणी शिंदे आणि साथीदारांनी मद्यालयातील व्यवस्थापकाकडे केली होती. व्यवस्थापकाने नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. ग्राहकांना धमकावले तसेच मद्यालयाची तोडफोड करुन आरोपी पसार झाले.
त्यानंतर आरोपी इंगळे यांना भेटले. दरमहा हप्ता न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या इंगळे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.