पिंपरी : पुणे महामेट्रोने पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडीपर्यंतच्या मार्गाच्या विस्तारीकरणाची ९१० कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. विस्तारित मार्गाचे काम तीन वर्षे आणि तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे.

पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील मार्गिका एक आणि मार्गिका दोन मिळून २४ किलोमीटर मार्गावर प्रवासी सेवा सुरू झाली आहे. उर्वरित नऊ किमी मार्गाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. पुणे मेट्रोतील स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड महापालिका या मार्गिका एक मधील प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या पिंपरी महापालिका ते निगडी या मार्गाच्या विस्तारीकरणाची निविदा महामेट्रोने प्रसिद्ध केली आहे. या विस्तारित मार्गाला केंद्र सरकारने २३ ऑक्टोबर २०२३ रोजी मान्यता दिली. या मार्गाची लांबी ४.५१९ किलो मीटर असून या मार्गिकेचा खर्च ९१०.१८ कोटी इतका आहे.

हेही वाचा >>> पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वेळेपायी पुण्यातील नवीन टर्मिनलचे टेकऑफ होईना!

या विस्तारित मार्गाचे काम तीन वर्षे आणि तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे. या मार्गिकेचे बांधकाम स्वीकृतीपत्र मिळाल्यापासून १३० आठवड्यांत पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. हा संपूर्ण मार्ग उन्नत असून, या मार्गावर चिंचवड, आकुर्डी, निगडी आणि भक्तीशक्ती चौक ही चार स्थानके असणार आहेत. महापालिका ते चिंचवड स्थानकातील अंतर १.४६३ किलोमीटर, चिंचवड ते आकुर्डी स्थानकांतील अंतर १.६५१ किलोमीटर, आकुर्डी ते निगडी स्थानकांतील अंतर १.०६२ किलोमीटर आणि निगडी स्थानक ते भक्ती शक्ती चौक स्थानकांतील अंतर ९७५ मीटर असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोट या विस्तारित मार्गिकेमुळे चिंचवड, आकुर्डी, निगडी आणि भक्तीशक्ती चौक हे विभाग मेट्रो नेटवर्कला जोडले जाणार आहेत. यामुळे त्या भागांतील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे.- श्रावण हर्डीकर व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो