पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनच्या (महामेट्रो) दुसऱ्या टप्प्यातील वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली-विठ्ठलवाडी या उन्नत मार्गांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या दोन्ही मार्गांसाठी ३ हजार ६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, पुढील चार वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे स्पष्टीकरण ‘महामेट्रो’कडून देण्यात आले.

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट (पर्पल लाइन) मार्गिकेचा विस्तार अनुक्रमे निगडी व कात्रजपर्यंत करण्यासाठी यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे, तर वनाझ ते रामवाडी या मार्गिकेला राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली असून, गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारकडे मान्यतेचा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विस्तारित मार्गांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. लवकरच या मार्गांचे काम सुरू होण्याची अपेक्षा आहे.

पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर सध्या मेट्रोची सेवा केवळ रामवाडीपर्यंत सुरू आहे. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तारीकरणात वाघोलीपर्यंत विस्तार करण्याबाबत नियोजन आहे. सद्य:स्थितीला या परिसरातून येणाऱ्या नागरिकांना रामवाडीच्या पुढे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसने किंवा खासगी वाहनांद्वारे करावा लागतो. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची वाघोलीपर्यंत मेट्रोचा विस्तार करण्याची मागणी केली जात होती.

केंद्राकडून मंजुरी मिळाल्याने प्रवाशांच्या मागणीला यश मिळाले असून, पुणे शहरातील नागरिकांना शहराच्या पूर्व – पश्चिम भागात प्रवास करणे आणखी सोयीचे व आरामदायक होणार आहे.

कसा होणार विस्तार ?

वनाज ते चांदणी चौक (मार्गिका २अ) या १.२ किलोमीटर लांबीच्या विस्तारित मार्गावर कोथरूड बस डेपो आणि चांदणी चौक अशी दोन स्थानके प्रस्तावित आहे, तर रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (मार्गिका २ ब) मार्गिका १२.७५ किलोमीटर असून, त्यामध्ये विमाननगर, सोमनाथ नगर, खराडी बायपास, तुळजाभवानी, उबाळेनगर, अप्पर खराडी रोड, वाघेश्वर मंदिर, वाघोली, सिद्धार्थनगर, बकोरी फाटा, विठ्ठलवाडी अशी १३ स्थानके नव्याने जोडली जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो विस्तार प्रकल्पाचा अंदाजे ३६२४.२४ कोटी रुपये अपेक्षित असून, साधारण चार वर्षांच्या कालावधीत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दोन्ही मार्गिकांमुळे पुणे शहराचे पूर्व व पश्चिम भाग मेट्रोने उर्वरित शहरांशी जोडले जाणार आहे. या भागातील हजारो नागरिकांना याचा फायदा होईल. – श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, पुणे महामेट्रो.