पुणे : फटाके वाजवताना झालेल्या वादातून हडपसरमधील रामटेकडी भागात दोन गटात झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही घटना घडली होती. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एकाला अटक केली असून, साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जितेंद्र परमेश्वर ठोसर (वय ३५, रा. रामटेकडी, हडपसर) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ठोसर याचा शुक्रवारी सकाळी रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी खन्नासिंग अजितसिंग कल्याणी (वय ४५, रा. साईमंदिर रामटेकडी) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्राजक्ता अविनाश देडगे (वय २५, रा. रामटेकडी, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाचा यश विश्वजीत ठोसर (वय ३०) हा रामटेकडी भागात चायनीज खाद्यपदार्थ विक्रीची गाडी लावतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करण्यासाठी अनिता विश्वजीत ठोसर, अश्विनी जितेंद्र ठोसर, जितेंद्र ठोसर, विश्वजीत ठोसर, वंश ठोसर हे तेथे आले होते. त्यावेळी एक आरोपी पेटते फटाके रस्त्यावर फेकत होता. आरोपीने पेटता फटका चायनीज खाद्यपदार्थाच्या गाडीजवळ फेकला. तेव्हा यश ठाेसर याने आरोपींकडे विचारण केली.
‘खाद्यपदार्थ विक्रीच्या गाडीवर तेल, सिलिंडर आहे. गाडीच्या दिशेने फटाके फेकू नको’, असे त्याने आरोपींना सांगितले. त्यानंतर आराेपी खन्नासिंग कल्याणी आणि साथीदार चायनीज खाद्यपदार्थाच्या गाडीजवळ आले. त्यांच्याकडे पाईप, तसेच तीक्ष्ण शस्त्रे होती. आरोपींनी वंश ठोसर याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. जितेंद्र ठोसर याच्यावर शस्त्राने वार केले. फिर्यादी प्राजक्ता देडगे यांची सासू नीलावती आणि पती अविनाश यांना पाइपने मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या जितेंद्र ठोसर यांचा उपचारा दरम्यान शुक्रवारी पहाटे रुग्णालयात मृत्यू झाला, अशी माहिती वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.
दरम्यान, आरोपी खन्नासिंग कल्याणी याने परस्परविरोधी फिर्याद दिली अहे. कल्याणी यांचा मुलगा आणि पुतणे यांना फटाके वाजवताना झालेल्या वादातून देडगे, ठोसर यांनी मारहाण केल्याचे कल्याणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाकडे तपास करत आहेत.
