पुणे : शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने कार्यान्वित असलेल्या आणि बांधकाम सुरू असेलल्या मेट्रो मार्गिकांच्या जाळ्यांव्यतिरिक्त नव्याने ३१२ किलोमीटर लांबीची मेट्रो मार्गिका आणि मेट्रो-लाईट मार्गिका, त्यामध्ये ८०.५ किलोमीटर नवीन बस रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टिम (बीआरटीएस) मार्ग आणि ४६.३ किलोमीटर हाय फ्रिक्वेन्सी बस मार्ग करण्यात येणार आहेत.
पुणे महानगर प्रदेशासाठी (पीएमआर) महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशन लिमिटेडने ‘सर्वंकष गतिशीलता योजना’ (काॅम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन) तयार केली आहे. त्यामध्ये या शिफारशी करण्यात आल्या आहेत. यामुळे शहर आणि परिसरातील वाहतुकीचा वेग वाढेल, असा दावाही करण्यात आला आहे. या योजनेचे सादरीकरण ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सादरीकरण केले. हा आराखडा पुढील तीस वर्षांसाठीचा असून शाश्वत गतिशीलता, सुलभ वाहतूक पर्याय, मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब, कमी पर्यावरणीय समस्या आणि कमी खर्चात सार्वजनिक वाहतुकीचा प्रवास या बाबींना प्राधान्य देण्यात आले आहे.
आराखड्यातील प्रमुख शिफारशी
सर्वंकष गतिशीलता योजनेच्या प्रमुख शिफारशींमध्ये सध्याच्या मेट्रो मार्गिकांच्या जाळ्या व्यतिरिक्त ३१२ किलोमटीर मेट्रो आणि मेट्रो लाईट मार्गिकांची कामे करण्यात येणार आहेत. त्यामध्ये ८०.५ किलोमीटर नवीन बस रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टिम (बीआरटीएस) मार्ग आणि ४६.३ किलोमीटर हाय फ्रिक्वेन्सी बस मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात येत्या काळात चार हजार आणि २०५४ पर्यंत ११ हजार ५६४ बस घेण्याचे आराखड्यात नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर ६४१ किलोमीटर लांबीचे नवीन बस मार्ग तयार करण्याचेही प्रस्तावित आहे.
बारा टर्मिनलचा पुनर्विकास
आराखड्यात पीएमपीच्या सध्याच्या बारा टर्मिनलचा पुनर्विकास आणि ११ नवीन टर्मिनलची निर्मिती, सध्याच्या पाच आगारांचा पुनर्विकास आणि १५ नवीन आगार तयार करण्याचे प्रस्तावित आहे. आंतर-शहर कनेटिव्हिटीसाठी सात आंतर-राज्य बस टर्मिनलचा पुनर्विकास आणि पाच नवीन टर्मिनलचे बांधकाम करण्याचे नियोजित आहे.
नदीवर १९ पुलांची उभारणी
रस्ते पायाभूत सुविधांमधील सुधारणांसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात ५५२ किलोमीटरचे मिसिंग लिंक, ४३८ किलोमीटर रस्त्यांचे रुंदीकरण, २९० किलोमीटरचे विविध वर्तुळाकर मार्ग (इनर, इंटमीडिएट आणि आऊटर), १८ ग्रेड सेपरेटर, उड्डाणपूल, २० रेल्वे ओव्हर आणि अंडर ब्रीज आणि नदीवरील १९ पुलांची उभारणीही करण्यात येणार आहे.
३४१ किलोमीटर लांबीचे पादचारी मार्ग
ग्रीन मोबिलिटी आणि सक्रिय वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी आराखड्यामध्ये पुण्यात ३४१ किलोमटीर लांबीचे पादचारी मार्ग आणि २३० किलोमीटर लांबीचे सायकल मार्ग प्रस्तावित आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये २६६ किलोमीटर लांबीचे पादचारी, तर १७० किलोमीटर लांबीच्या सायकल मार्गांची शिफारस करण्यात आली आहे. महत्त्वाच्या १६ ठिकाणी पादचाऱ्यांसाठी ग्रेड सेपरेटर क्राॅसिंगची आवश्यकताही आराखड्यात नमूद करण्यात आली आहे.
१४ ट्रक टर्मिनल, ७ लाॅजिस्टिक हब
लाॅजिस्टिक आणि मालवाहतुकीसाठी पुणे महानगर प्रदेशमध्ये (पीएमआर) १४ ट्रक टर्मिनल, ७ लाॅजिस्टिक हब आणि २६ मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब तयार करण्याचा प्रस्ताव आहे. पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रो, रेल्वे आणि रस्ते या तिन्ही सार्वजनिक वाहतुकीच्या जाळ्यातून जोडण्याचेही नियोजन आहे.
शहर सर्वंकष गतिशीलता योजना आराखडा यापूर्वी २०१८ मध्ये तयार करण्यात आला होता, सुधारित आराखड्यात सन २०५४ मधील लोकसंख्यावाढ, रस्ते अपघात, वाढते नागरीकरण आणि त्या अनुषंगाने पीएमपीएल बस वाहतूक आराखडा, डेपो, मेट्रो सेवांचा विस्तार, बीआरटीएस कॉरिडॉर, पुरंदर विमानतळाकरिता बाह्यवळण रस्ता, रिंग रोड, मिसिंग लिंक आराखडा, सायकल जाळे, मुख्य बाजारपेठ मार्ग, ट्रक टर्मिनल, लॉजिस्टिक हब, मल्टि मॉडेल इंटिग्रेशन हब, सार्वजनिक वाहतूकतळ, पर्यटन विकास; त्या माध्यमातून रोजगार निर्मिती, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात होणारी वाढ या बाबींचा करता २ हजार ५५० चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी १ लाख तीस हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राज्य शासनाच्या मंजुरीसाठी आराखडा सादर करण्यात आला आहे. – श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो