पुणे : वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मेट्रोच्या विस्तारित टप्प्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी देणे तसेच खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासलाबरोबरच नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग या टप्प्यांना पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाची (पीआयबी) मान्यता मिळविण्यासंदर्भात केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांची दिल्ली येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

पुणे मेट्रोचे दोन्ही मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू असताना वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मेट्रो मार्गाचे विस्तारीकरण प्रस्तावित आहे. यासाठी महामेट्रोने सविस्तर विकास आराखडा तयार केला असून, याला राज्य सरकारचीदेखील मंजुरी मिळालेली आहे. तसेच पब्लिक इनव्हेसमेंट बोर्डाचीही मान्यता ११ मार्च २०२५ रोजी मिळाली असून, आता केंद्रीय मंत्रिमंडळाची अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे. हा प्रस्ताव लवकरात लवकर केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात यावा, अशी मागणी मोहोळ यांनी खट्टर यांच्याकडे केली.

तसेच, मेट्रोच्या विस्तारीकरणाचा भाग म्हणून खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला हा मार्गही दृष्टीक्षेपात असून, नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग हा जोडमार्गही प्रस्तावित आहे. याही प्रकल्पाला राज्य सरकारची मंजुरी मिळाली असून, पीआयबीची मान्यता प्रतीक्षेत आहे. तसेच पीआयबीच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळात ठेवण्यात यावा, याबाबत मोहोळ यांनी खट्टर यांच्याशी चर्चा केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहोळ म्हणाले, ‘शहरातील मेट्रो प्रकल्पांना गती देण्याची मोदी सरकारची भूमिका असून, नवे प्रस्तावित मार्ग लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. संपूर्ण शहरभर मेट्रोचे जाळे तयार करताना त्याला आणखी वेग यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही विषयांबाबत खट्टर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून, याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल हा विश्वास वाटतो.’