पुणे : पुणे मेट्रो टप्पा- २ खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी मेट्रो मार्गिकेअंतर्गत हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रस्ता या दोन मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या अंमलबजावणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. या निर्णयामुळे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रस्ता या दोन उपमार्गिका एकूण १६ किलोमीटर लांबीच्या असून त्यामध्ये एकूण १४ उन्नत स्थानकांचा समावेश असेल. या दोन्ही उपमार्गिकांसाठी ५ हजार ७०४ कोटी रुपये खर्च येणार असून या पूर्णतः उन्नत मेट्रो प्रकल्पांची महा मेट्रोमार्फत अंमलबजावणी करण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या दोन्ही प्रकल्पांमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळेल. तसेच पुणे मेट्रोचे जाळे पूर्वेकडे विस्तारित होणार असून पूर्व पुणे आणि परिसरातील ग्रामीण भागालाही मेट्रो सेवेचा लाभ मिळेल. लाखो प्रवाशांना जलद आणि सुरक्षित वाहतुकीची सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
पुणे मेट्रो टप्पा-२ अंतर्गत होणाऱ्या या दोन उपमार्गिकांमुळे हडपसर, फुरसुंगी, लोणी काळभोर आणि सासवडसारख्या वाढत्या उपनगरांना मेट्रो जोडणी मिळेल. या मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ वाचेल आणि प्रदुषण कमी होण्यास मदत होईल, अशी माहितीही पवार यांनी दिली.
प्रकल्प दृष्टीक्षेपात
या प्रकल्पासाठी महामेट्रोने २०२३ मध्ये सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केला होता. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासोबत (पीएमआरड़ीए) चर्चा करून फेब्रुवारी २०२५ मध्ये पुणे महानगर पालिकेने स्थायी समितीमध्ये मंजुरी दिली होती. त्यानुसार खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी असा ३१.६४ किलोमीटर मार्ग प्रस्तावित आहे. मार्च २०२५ मध्ये संबंधित प्रकल्प अहवाल केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठिवण्यात आला आहे. मात्र, अद्याप केंद्र सरकारकडून मंजुरी मिळालेली नाही. मात्र, राज्य शासनाच्या निर्देशानुसार जमीन अधिग्रहण, पर्यावरण विभागाची मंजुरी आणि निविदा प्रक्रिया या तातडीने मार्गी लागण्याचा अंदाज आहे.
प्रामुख्याने या प्रकल्पामुळे पूर्व आणि दक्षिण भागातील स्थानिकांना मध्यवर्ती भागात सहज प्रवास करता येणार असून, उपनगरीय वाहतूक कोंडीतून तसेत प्रदूषणापासून मोठी सूटका होणार असल्याचा अंदाज महामेट्रोकडून व्यक्त करण्यात येत आहे.
