पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात पुणे मेट्रो राज्यात अव्वल ठरली आहे. आतापर्यंत सुमारे ७३.७५ टक्क्यांपर्यंत डिजिटल व्यवहार केल्याचे आकडेवारीतून समोर आले. त्यामुळे स्मार्ट पुणेकरांची स्मार्ट दिशेने वाटचाल सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनच्या (महामेट्रो) पुण्यातील मेट्रो मार्गिका विस्ताराबरोबर प्रवाशांना पायाभूत आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. धावपळीच्या धकाधकीच्या जीवनात प्रवाशांना कागदी व्यवहारांना दूर ठेवून (रोख व्यवहार) ‘आपली मेट्रो’ मोबाइल ॲप, क्यूआर कोड स्कॅनर, यूपीआय, महामेट्रो कार्ड, व्हाॅट्सॲप आणि किऑस्क अशा डिजिटल माध्यमांची सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर स्थानकांवर तिकीट केंद्र निर्माण करून थेट मशिनच्या माध्यमातून थेट रोखीने व्यवहाराची सुविधाही निर्माण केली आहे. मात्र, प्रवाशांकडून डिजिटल व्यवहारांना पसंती दिली जात आहे.

महामेट्रो प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गिकांवर प्रवाशांची संख्या वाढली आहे. जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत चार कोटी ४५ लाख ३३ हजार ८८ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला आहे. त्यांपैकी ७४ लाख २३ हजार ७९१ प्रवाशांनीच पेपर तिकीट काढले आहेत, उर्वरित सर्व प्रवाशांनी डिजिटल व्यवहार करून तिकीट प्राप्त केले आहेत.

गेल्या दहा महिन्यांतील मेट्रो प्रवाशांच्या व्यवहारांचा आढावा

– एकूण प्रवासी – ४,४५,३३,०८८

– ऑनलाइन तिकीट घेतलेले – १,०५,९६,९८२

– केंद्रावर तिकीट घेतलेले – १,०२,५०,२९८

– पेपर तिकीट काढलेले – ७४,२३,७९१

डिजिटल व्यवहाराचा आढावा

– एकूण ऑनलाइन तिकीट घेतलेले – ७३.७५ टक्के

– किऑस्क – २.५३ टक्के

– वेंडिंग मशिनद्वारे – ०.५० टक्के

– व्हाॅट्स ॲप – ६४.१० टक्के

– आपली मेट्रो ॲप ३२.८७ टक्के

पुणे महामेट्रोने प्रवाशांना सुलभ आणि सहज सेवा उपलब्ध करून देण्यासाठी व्यवहाराच्या दृष्टीने अनेक डिजिटल पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे प्रवासीदेखील रांगेत उभे राहण्याऐवजी, वेळ वाचविण्यासाठी डिजिटल व्यवहारांना सर्वाधिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे राज्यात पुणे मेट्रो अव्वल स्थानावर आहे. विस्तारीकरणाच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत असून, कॅशलेस व्यवहारांना आणखी प्राधान्य देण्यात येईल. – श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो