गरवारे महाविद्यालय ते शिवाजीनगर सत्र न्यायालय आणि फुगेवाडी ते जिल्हा सत्र न्यायालय या दरम्यानच्या कामांनी वेग घेतला असून नव्या वर्षात या दोन्ही अंतरातील मार्गांवर मेट्रोची प्रवासी सेवा सुरू होणार आहे. दरम्यान, अंतिम टप्प्यात आलेली कामे २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याची सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना केली.
हेही वाचा- किल्ले सिंहगड परिसर अतिक्रमण वेढ्यातून मुक्त; वनविभागाची कारवाई
चंद्रकांत पाटील यांनी शासकीय विश्रामगृह येथे मेट्रो अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डाॅ. ब्रिजेश दीक्षित, प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ, कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे या वेळी उपस्थित होते. स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत विविध प्रकल्प आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांच्या योजनांचा आढावाही या वेळी घेण्यात आला.
मार्च अखेरपर्यंत शहरात सुरू असलेल्या ३३ किलोमीटरच्या मेट्रो मार्गिकांची कामे पूर्ण होतील, असे नियोजन करण्याची सूचना चंद्रकांत पाटील यांनी केली. कामाची गती वाढविण्यासाठी राज्य शासनातर्फे आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्प अहवालाला राज्य शासनाची मंजुरी मिळविण्यासाठीचा पाठपुरावा सुरू असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा- मुंबई, ठाण्यातील गोवर उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नागरिकांना खबरदारीचे आवाहन
दोन टप्प्यातील मेट्रो मार्गिकेसाठी आवश्यक असलेली काही कामे पूर्ण झाली आहेत. वनाझ ते गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते फुगेवाडी या दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे ६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर पाच महिन्यांनी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी गरवारे महाविद्यालय ते डेक्कन जिमखाना या दरम्यानच्या ८१० मीटरवर मेट्रोची यशस्वी चाचणी घेण्यात आली. फुगेवाडी मेट्रो स्थानक ते दापोडी मेट्रो स्थानकादरम्यानची चाचणी यशस्वी झाली. त्यामुळे पुढील काही महिन्यांत गरवारे महाविद्यालय मेट्रो स्थानकाच्या पलीकडे शिवाजीनगर न्यायालय स्थानक आणि फुगेवाडी स्थानक येथून शिवाजीनगर स्थानकापर्यंतच्या मार्गावर मेट्रो धावणार आहे. वीजपुरवठ्याची कामेही पूर्ण झाली असून स्थानकांच्या उभारणीनेही गती घेतली आहे. ही कामे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होतील, असा दावा महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
हेही वाचा- पुणे: नवा बासमती बाजारात दाखल; खरेदीसाठी व्यापारी थेट बांधावर
दरम्यान, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा आढावा घेतला. अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे आदेश या वेळी पाटील यांनी दिले. या वेळी शहरातील प्रकल्पांच्या सद्य:स्थितीची माहिती पाटील यांनी घेतली. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशनच्या प्रकल्पांचाही आढावा घेतला.