पुणे : मौजमजेसाठी वाहन चोरीचे गुन्हे करणाऱ्या अल्पवयीनाला गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने ताब्यात घेतले. चोरट्याकडून एक दुचाकी आणि दोन रिक्षा जप्त करण्यात आल्या. वारजे भागातीाल रामनगर परिसरात ही कारवाई करण्यात अलाी.

अल्पवयीनाने सहकारनगर परिसरातून रिक्षा चोरली होती. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अल्पवयीन वारजे भागातील रामनगर परिसरातील माेकळ्या जागेत थांबला होता. त्याच्याकडे असलेली रिक्षा चोरीची असल्याची माहिती पोलीस कर्मचारी साईकुमार कारके यांना मिळाली. त्यानतंर पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने रिक्षा चोरल्याची कबुली दिली.

अल्पवयीनाने सहकारनगर, वारजे, हडपसर परिसरातून एक दुचाकी, दोन रिक्षा चाेरल्याचे उघड झाले. त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे, वर्षा कावडे, पोलीस कर्मचारी धनंजय ताजणे, साईकुमार कारके, गणेश ढगे, दत्तात्रय पवार, अजित शिंदे, नारायण बनकर, प्रदीप राढोट, निनाद माने यांनी ही कामगिरी केली.

दागिने हिसकावणारा गजाआड

महिलांकडील दागिने हिसकावणाऱ्या चोरट्याला दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाने गजाआड केले. चोरट्याकडून मोटार, मोबाइल संच असा सहा १५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. सुनील रावण शिंदे (वय २९, रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शिंदे याने सहकारनगर भागात एका महिलेचे दागिने हिसकाविले होते. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाकडून समांतर तपास करण्यात येत होता. तपासात शिंदे याने महिलेकडील दागिने हिसकाविल्याची माहिती धनंजय ताजणे, रवींद्र लोखंडे, साईकुमार कारके यांना मिळाली. शिंदे शनिवार पेठेतील नदीपात्रातील रस्त्यावर थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून मोटार आणि मोबाइल संच जप्त करण्यात आला. चौकशीत शिंदे आणि त्याच्याबरोबर असलेल्या तीन साथीदारांनी महिलेकडील दागिने हिसकावण्याचा गुन्हा केल्याची माहिती मिळाली आहे. शिंदे याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्याला तपाससाठी सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.