पुणे : हडपसर परिसरातील महंमदवाडीचे नामकरण महादेववाडी करावे, अशी मागणी हडपसरचे भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेतील आमदार योगेश टिळेकर यांनी केली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे त्यांनी ही मागणी केल्याने महंमदवाडीच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे.

हडपसर परिसरातील महंमदवाडीचे नाव बदलण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनही केले होते. या पार्श्वभूमीवर पॉईंट ऑफ इन्फर्मेशनमध्ये मुद्दा उपस्थित करत योगेश टिळेकर यांनी महंमदवाडी गावाचे नाव बदलून महादेववाडी असे करण्याची मागणी केली.

‘गेली ३० वर्षे ग्रामस्थ महंमदवाडीचे नाव बदलण्याची मागणी करत आहेत. एकही मुस्लिम कुटुंब येथे नसल्याने १९९५ मध्ये गावाचे नाव महादेववाडी करण्यासाठी प्रस्ताव एकमताने मंजूर झाला. मात्र, १९९७ मध्ये हे गाव महापालिकेत समाविष्ट झाल्याने नामांतर रखडले. स्थानिक लोकप्रतिनिधी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र, त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून, शासनाने यामध्ये लक्ष घालून मंहमदवाडीचे नाव महादेववाडी करावे,’ अशी मागणी टिळेकर यांनी केली.

दरम्यान, महापालिकेच्या नाव समितीला नामांतरणासंदर्भात प्रस्तावही काही वर्षांपूर्वी देण्यात आला होता. नामकरणाचे अधिकार महापालिकेला नसल्याचे तत्कालीन महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे.

दरम्यान, महायुतीमधील मित्रपक्ष शिवसेनेकडूनही यापूर्वीही तशी मागणी सातत्याने करण्यात आली आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्राबल्य आहे. या मागणीसंदर्भात शिवसेनेचे (शिंदे) शहरप्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी तसे पत्रही राज्य शासनाला दिले होते. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनीही या मागणीला काही दिवसांपूर्वी सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच तत्कालीन महापालिका आयुक्तांना यासंदर्भात गोगावले यांनी सूचनाही केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनीही यासंदर्भात काय करता येईल, याची तपासणी करून तातडीने कार्यवाही करावी, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे मंहमदवाडीचे नामकरण महादेववाडी करण्याचा मुद्दा पुन्हा पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.