पुणे : शहरातील रस्त्यांची दुरुस्ती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. त्यासाठी १९३ कोटींचा खर्च अपेक्षित असून रस्ते दुरुस्तीसाठी आवश्यक निधी वर्गीकरणाच्या प्रस्तावातून उपलब्ध केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ५० कोटी रुपये वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करण्यात येणार असून, याबाबतचा प्रस्ताव पथ विभागाकडून तयार करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सततची रस्ते खोदाई आणि त्यानंतर झालेल्या पावसाने शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी किमान पाचशे कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यातच जी-२० परिषदेच्या निमित्ताने प्राधान्याने रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत.

हेही वाचा – ‘टेमघर’ पुन्हा रिकामे, दुरुस्तीच्या कामांसाठी पाणी सोडण्यास सुरुवात

शहरातील ५० रस्त्यांवर साधारणपणे १४० ठिकाणी रस्त्यांच्या दुरुस्तीची आवश्यकता आहे. यासाठी १९३ कोटींचा खर्च येणार असून, यातील ५० कोटी वर्गीकरणाने, तर १४३ कोटी तातडीच्या कामाअंतर्गत (७२ ब अनुसार) उपलब्ध केले जाणार आहेत. महापालिकेच्या पथ विभागाकडून दुरवस्था झालेल्या रस्त्यांची यादी आणि दुरवस्था झालेल्या ठिकाणांची पाहणी करून त्याची सविस्तर यादी तयार करण्यात आली आहे.

सद्य:स्थितीत एकूण १ हजार ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सर्वेक्षणामध्ये प्रथम टप्प्यामध्ये तातडीने १४० ठिकाणच्या आणि एकूण १४८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. शहरातील महत्त्वाचे जोड रस्ते, वर्दळीचे रस्ते याचा विचार करून कोणत्या रस्त्यांचे डांबरीकरण करायचे आणि कोणत्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करायचे हे निश्चित करण्यात आले आहे. सात रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि ४३ रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ५० रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यानंतरच्या टप्प्यात सात, तिसऱ्या टप्प्यात १४ आणि चौथ्या टप्प्यात २१ रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

हेही वाचा – महापालिकेतील कंत्राटी सुरक्षा रक्षकांना दिलासा, ४५ वर्षांवरील कामगारांना कामावरून न काढण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

यांत्रिक पद्धतीने रस्त्यांची साफसफाई

शहरातील रस्त्यांची साफसफाई आता यांत्रिक पद्धतीने होणार आहे. यासाठी ३ कोटी ४१ लाख १३ हजार रुपये खर्च अपेक्षित असून, याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे ठेवला आहे. बंडगार्डन रस्ता, पुणे रेल्वे स्थानक रस्ता आणि कोरेगाव पार्क या रस्त्यांची साफसफाई यांत्रिक पद्धतीने करण्यात येणार आहे.

यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्यासाठी महापालिकेला पंधराव्या वित्त आयोगांतर्गत निधी मिळाला आहे. त्यामुळे बंडगार्डन रस्ता, संगमवाडी, रेल्वे स्थानक, कोरेगाव पार्क रस्ता या सर्व रस्त्यांसाठी पहिल्या वर्षासाठी प्रति किलोमीटर ८४९ रुपयांप्रमाणे १ कोटी ५ लाख ९७ हजार रुपये, दुसऱ्या वर्षासाठी प्रति किलोमीटर ८९४ रुपये प्रमाणे १ कोटी ११ लाख ५८ हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षासाठी प्रति किलोमीटर ९९० रुपये प्रमाणे १ कोटी २३ लाख ५७ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune mnc administration proposal to repair roads using ambitious projects funds pune print news apk 13 ssb
First published on: 03-01-2023 at 12:05 IST