पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महापालिका प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी शहरातील प्रमुख घाटांवर कृत्रिम हौद, लोखंडी टाक्या ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी मूर्तीचे विसर्जन न करता त्या दान करून पर्यावरणपूरक विसर्जनासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्याचे नियोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. सुरक्षिततेसाठी यंदा प्रथमच काही घाटांवर ड्रोनद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे.

गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी घाटांवर आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांनी पाण्यात जाण्याचा हट्ट न धरता घाटांवर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने गणेशमूर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पुरेशी काळजी घेण्यात आली असून दुर्घटना होऊ नये, यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.

स्वच्छता, आरोग्य सुविधा

महापालिकेच्या वतीने शहरातील प्रत्येक विसर्जन घाटांवर व मिरवणूक मार्गांवर स्वच्छतेसाठी विशेष कर्मचारी नेमण्यात आले आहेत. आरोग्य विभागाकडून वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका आणि प्राथमिक उपचार केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मिरवणूक मार्गावर जागोजागी डॉक्टर, परिचारिका यांच्यासह आवश्यक त्या आरोग्यसेवा पुरविण्यासाठी आरोग्य कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

सुरक्षा आणि ड्रोनद्वारे देखरेख

विसर्जनावेळी मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी, महापालिका यंत्रणा आणि स्वयंसेवक तैनात राहणार आहेत. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रथमच काही घाटांवर ड्रोनद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे.

३२८ ठिकाणी निर्माल्य कलश

महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण ३८ हौद, २८१ ठिकाणी ६४८ लोखंडी टाक्यांमध्ये गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. निर्माल्य संकलनासाठी ३२८ निर्माल्य कलश, कंटेनरची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मूर्तीसंकलनासाठी २४१ केंद्र तयार करण्यात आली आहेत. गणेश विसर्जनानंतरची शाडूची माती संकलित करून त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे.

४६ ठिकाणी शाडू मूर्ती संकलन केंद्र

क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण ४६ ठिकाणी शाडू मूर्ती संकलन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. क्षेत्रीय कार्यालयांमार्फत संकलित केलेल्या गणेश मूर्तींचे पुनर्विसर्जन वाघोली येथील खाणीमध्ये केले जाणार आहे. त्यासाठी तीन पाळ्यांमध्ये सेवक आणि अधिकाऱ्यांची तसेच सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली आहे. तसेच मोटारवाहन विभागातर्फे आवश्यक वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, यंदा ५५४ फिरत्या शौचालयांची मागणी क्षेत्रीय कार्यालयामार्फत करण्यात आली असून, त्यानुसार पुरवठा करण्यात आला आहे.

गणेश विसर्जन सुरक्षित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. नियमांचे पालन करून उत्सव साजरा करावा. उत्सव पाहण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.- संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा विभाग, पुणे महापालिका