पुण्याच्या उपमहापौरपदी भाजपचे सिद्धार्थ धेंडे हे बिनविरोध निवडून आले आहेत. उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी आज निवडणूक घेण्यात आली. काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसकडून लता राजगुरू यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यांनी अर्ज मागे घेतल्याने धेंडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे गेल्याच महिन्यात निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या उपमहापौरपदासाठी निवडणूक घेण्यात आली. भाजपकडून सिद्धार्थ धेंडे यांना, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून लता राजगुरु यांना उमेदवारी दिली होती. निवडणुकीवेळी पीठासीन अधिकारी लहुराज माळी यांनी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांची वेळ दिली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवार लता राजगुरू यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे धेंडे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पीठासीन अधिकारी माळी यांनी केली. यावेळी महापौर मुक्ता टिळक, अतिरिक्त आयुक्त शितल उगले, पीठासीन आधिकारी माळी आणि सर्वपक्षीय गटनेते उपस्थित होते.