पुणे : पुणे महापालिकेच्या विद्युत विभागाने शहरातील अनधिकृत फलक आणि त्यांच्या विद्युत जोडणीची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बेकायदा फलक आढळल्यास संबंधित व्यक्ती, संस्थांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. महापालिकेच्या विद्युत विभागाच्या प्रमुख मनीषा शेकटकर यांनी ही माहिती दिली. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांना याबाबत सूचना देण्यात आल्या असून, पुढील दोन दिवसांत याची माहिती गोळा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

नाना पेठ येथील इनामदार चौकामधील राजकीय पक्षाशी संबंधित एका फलकाला स्पर्श झाल्याने शाळकरी मुलीला जीव गमवावा लागला. या फलकासाठी महापालिकेच्या विजेच्या खांबावरून बेकायदा विद्युत जोडणी घेण्यात आल्याचे उघडकीस आले होते. सर्वच स्तरांतून टीका होऊ लागल्याने महापालिकेने जबाबदारी घेऊन बेकायदा उभारण्यात आलेले जाहिरात फलक आणि त्यासाठी घेण्यात आलेली वीजजोडणी याची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्या फलकांवर बेकायदा वीजजोडणी घेण्यात आली आहे, त्याची तपासणी करून बेकायदा फलक आणि परवानगी न घेता वीजजोडणी घेतल्याचे लक्षात येताच त्यावर कारवाई करून वीजजोडणी तोडून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरातील विविध भागांत राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बेकायदा फलक उभारले आहेत. तसेच अनेक सार्वजनिक मंडळे, संस्था, संघटनांनी अनधिकृत फलक उभारून विद्युत जोडणी घेतली आहे. संबंधितांची माहिती तपासणी मोहिमेमुळे संकलित होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील बेकायदा जाहिरात फलक आणि त्यांना देण्यात आलेली वीजजोडणी याची तपासणी करण्यात येणार आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर ही माहिती संकलित करण्यात येणार असून, बेकायदा वीजजोडणी आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील दोन दिवसांत तपासणी पूर्ण केली जाणार आहे. – मनीषा शेकटकर, विद्युत विभाग प्रमुख, पुणे महापालिका