पुणे : शहरातील मुख्य आणि वर्दळीच्या पाच रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या रस्त्यांवर लवकरच ‘पे अँड पार्क’ योजना राबविण्यात येणार आहे. महापालिका प्रशासन आणि पोलिसांच्या वाहतूक विभागाने याचा आराखडा तयार केला आहे. लवकरच याची निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यानंतर नागरिकांना या रस्त्यांवर वाहने लावण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहे, अशी  माहिती महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता दिनकर गोजारे यांनी दिली.

शहरातील वर्दळीचे असणारे लक्ष्मी रस्ता, नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन) जंंगली महाराज रस्ता, विमाननगर, बाणेर येथील हायस्ट्रीट आणि बिबवेवाडी येथील स्वामी विवेकानंद रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ करण्यात येणार आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून महापालिका आणि वाहतूक पोलीस एकत्रित प्रयत्न करीत आहेत.

याचाच एक भाग म्हणून गेल्या काही महिन्यांपासून शहरातील प्रमुख चौक आणि रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत. याबरोबरच शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर बेशिस्तपणे उभे राहणाऱ्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ योजना राबविण्यात येणार आहे. महापालिकेने या कामासाठी निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काही दिवसांमध्ये यावर अंतिम निर्णय होऊन त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

दरम्यान, महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या प्रस्तावामध्ये दुचाकी वाहनांसाठी दर तासाला चार रुपये आणि चारचाकी वाहनांसाठी तासाला २० रुपये दर आकारण्यात येणार आहे. या पाच रस्त्यांपैकी केवळ लक्ष्मी रस्त्यावर दुचाकींसाठी ‘पे अँन्ड पार्क’ करण्यात येणार आहे. रस्ता अरुंद आणि एकेरी असल्याने या रस्त्याला जोडणाऱ्या काही अंतर्गत रस्त्यांवरही ‘पे अँन्ड पार्क’चे नियोजन करण्यात आले आहे. तर, उर्वरित रस्त्यांवर ठरावीक अंतराने पार्किंग व्यवस्था करण्यात येईल. यासाठी येत्या काही दिवसांत निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल, असे दिनकर गोजारे यांनी सांगितले.

काय घडले होते सात वर्षांपूर्वी

भारतीय जनता पक्षाची सात वर्षांपूर्वी महापालिकेत एकहाती सत्ता असताना शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर केला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्याची हिंमत सत्ताधारी भाजपने दाखविली नव्हती. मात्र, आता महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास पुढाकार घेतला आहे.