पुणे : राज्यात करोनाचा उपप्रकार जेएन.१ची रुग्णसंख्या वाढत आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या पुण्यात असून, महापालिकेने खासगी रुग्णालयांना संशयित रुग्णांची करोना चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, बाजारात रॅपिड अँटिजेन चाचणी किटचा तुटवडा निर्माण झाल्याने चाचणी कशी करायची, असा प्रश्न रुग्णालयांसमोर उपस्थित झाला होता. यातून मार्ग काढण्यासाठी आता महापालिकेच्या प्रयोगशाळांत खासगी रुग्णालयांना रुग्ण तपासणीसाठी पाठविण्यास सांगण्यात आले आहे.
राज्यात जेएन.१ चे २५० रुग्ण असून, त्यातील सर्वाधिक १५० रुग्ण पुण्यात आहेत. पुण्यातील रुग्णसंख्या जास्त असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने उपाययोजना करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता असताना खासगी रुग्णालयांना केवळ सूचना करण्याचे काम सुरू होते. आरोग्य विभागाने रुग्णालयांना संशयित रुग्णांच्या रॅपिड अँटिजेन चाचण्या वाढविण्याची सूचना केली. मात्र, शहरात रॅपिड अँटिजेन चाचण्यांच्या किटचा तुटवडा असल्याने या चाचण्या करता येत नसल्याचे खासगी रुग्णालयांचे म्हणणे आहे.
हेही वाचा >>>डेंग्यू, हिवतापावर अद्ययावत उपचार कसे करावेत? डॉक्टरांनी गिरवले धडे…
किटचा तुटवडा असल्याने महापालिकेच्या प्रयोगशाळांत खासगी रुग्णालये त्यांचे रुग्ण करोना चाचणीसाठी पाठवू शकतात, अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांसमोरील रुग्णांच्या करोना चाचणीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. महापालिकेकडून रुग्णालयांना चाचणी केंद्राची यादी पाठविण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.
महापालिकेने खासगी रुग्णालयांना रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्याचे निर्देश दिले. मात्र, या किटचा तुटवडा असल्याने चाचण्या करणे शक्य होत नव्हते. आता महापालिकेच्या चाचणी केंद्रामध्ये खासगी रुग्णालयांतील रुग्णांच्या चाचण्या होतील, असे हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे (पुणे शाखा) अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा >>>भाजपकडून हिंदू धर्माचे अवमूल्यन, निवडणुकांसाठी रामाचा वापर; डाॅ. कुमार सप्तर्षी यांची भाजपवर टीका
दरम्यान, खासगी रुग्णालयांना संशयित रुग्णांच्या करोना चाचण्या करण्यासाठी पुरेशा प्रमाणात बाजारात किट उपलब्ध नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाने त्यांना महापालिकेच्या चाचणी केंद्रात रुग्णांच्या चाचण्या करण्यास सांगितले आहे, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. भगवान पवार यांनी सांगितले.