पुणे : पुणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या ‘पीएमपीएमएल’च्या बसमध्ये सुरक्षिततेच्या कारणास्तव महिला सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तीन दिवसांपूर्वी स्वारगेट एस. टी स्थानकामध्ये तरुणीवर झालेल्या गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी पुढील काही दिवसांमध्ये केली जाणार आहे.

पुणे महापालिकेच्या शाळेत बसने येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. प्रत्येक विद्यार्थाी वाहतूक करणाऱ्या बसमध्ये महिला सुरक्षा रक्षक असणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूल बस, तसेच स्कूल व्हॅनमध्ये महिला सहाय्यक असतात, मात्र महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या बसमध्ये महिला सुरक्षारक्षकांचा अभाव आहे. त्यामुळे महापालिकेने विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक व्हावी, यासाठी पीएमपीएलच्या बसमध्ये महिला सुरक्षा रक्षक नेमण्याच्या दृष्टीने पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे.

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची ने-आण करण्याचे काम पीएमपीएलच्या सुमारे २०० ते ३०० बसच्या माध्यमातून केले जाते. महिला सुरक्षारक्षकांसाठी महापालिका प्रशासनाकडून शिक्षण विभागाबरोबर चर्चा केल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी सांगितले.

पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये बस मधून विद्यार्थी- विद्यार्थिनी येत असतात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या शिक्षण मंडळातील अधिकारी तसेच महापालिका प्रशासनातील विविध विभागातील अधिकाऱ्यांची याबाबत चर्चा देखील झाली आहे. त्यानंतर महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज म्हणाले, महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा महापालिकेचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या पीएमपीएमएल बसमध्ये महिला सुरक्षा रक्षक नेमल्या जाणार आहेत.