पुणे : शहरातील धोकादायक इमारती आणि वाड्यांच्या महापालिकेने नोटीस दिल्या असून या धोकादायक इमारतीचे बांधकाम काढून घ्यावे, असे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करत ३७ वाडा मालक आणि भाडेकरू यासाठी विरोध करत आहेत. त्यामुळे या वाड्यांची वीज जोडणी तसेच पाणी पुरवठा खंडित करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. धोकादायक झालेले हे वाडी रिकामे करण्यासाठी मदत मिळावी, असे पत्र महापालिकेने पोलिसांना दिले आहे.
शहराच्या मध्यवर्ती पेठांच्या भागांमध्ये अनेक जुने वाडे आहेत. या वाड्यांमध्ये जागा मालक आणि भाडेकरू असा जुनाच वाद सुरू असल्याने याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या वाड्यांना धोका निर्माण होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे वाडे रिकामे करावेत, अशी नोटीस पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने दिल्या आहेत. मात्र शहराच्या मध्यवर्ती पेठांमधील धोकादायक असलेले ३७ वाडे पाडण्यासाठी नागरिकांकडून विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर या वाड्यांना देण्यात आलेले वीज जोड आणि पाणी पुरवठा जोडणी तोडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
पुणे शहरात सद्यस्थितीला सुमारे दोन हजार ८०० जुने वाडे आहेत. काही वर्षांपूर्वी जुन्या वाड्यांची संख्या अधिक होती. अनेक जुन्या वाड्यांचा पुनर्विकास करण्यात आला असून तेथे उंच इमारती उभ्या राहिल्या आहेत. मात्र, काही वाड्यांमध्ये राहत असलेले जुने भाडेकरू आणि वाडा मालक यांच्यात वाद आहेत. त्यामुळे त्यांचा पुनर्विकास रखडला असून ते धोकादायक झाले आहेत. लाकूड आणि मातीचा वापर करून बांधलेले हे वाडे पावसाळ्यात कोसळण्याच्या काही घटना घडल्या आहेत. यामध्ये जीवितहानी देखील झालेली आहे. त्यामुळे पुन्हा अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नये यासाठी महापालिका जुन्या वाड्यांचे सर्वेक्षण करून त्यांना नोटीस देते.
महापालिकेने यंदाच्या वर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील तब्बल ११६ धोकादायक वाड्यांना नोटीस दिल्या आहेत. यापैकी ७६ वाडे आतापर्यंत उतरविण्यात आले आहेत. पुढील आठवड्याभरात काही वाडे उतरविण्याची तयारी संबंधित जागा मालकांनी केली आहे. मात्र ३७ वाडे मालकांकडून वाडे उतरविण्यास विरोध होत आहे. काही ठिकाणी पर्यायी व्यवस्था नाही, तर मालकी हक्क व अन्य वाद असल्याने हा विरोध होत आहे. धोकादायक वाडा कोसळल्यास होणारी जीवितहानी टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
सर्वात जास्त धोकादायक वाडे रविवार पेठत
शहरातील धोकादायक झालेल्या वड्यांना महापालिकेने नोटीस बजाविल्या आहेत. ते पाडण्यासाठी सर्वात अधिक वाडे रविवार पेठ येथील असून त्यांची संख्या ९ इतकी आहे. त्या पाठोपाठ भवानी पेठ, शुक्रवार पेठ, घोरपडी पेठ येथे प्रत्येकी पाच, बुधवार पेठेत चार, नाना पेठेत तीन, सदाशिव आणि गुरुवार पेठेत प्रत्येकी दोन आणि शनिवार पेठेत एका वाड्याचा समावेश आहे.
शहरातील ३७ धोकादायक वाडे मालकांना वारंवार नोटीस बजावल्या आहेत. त्यांच्याशी चर्चा करून काही पर्याय देखील सुचवले आहेत. मात्र त्यांचा विरोध कायम आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी वाडे रिकामे करण्यासाठी वीज आणि पाणी तोडण्यात येणार आहे. – राजेश बनकर, अधिक्षक अभियंता