पुणे : पुणे महापालिकेत उपायुक्त म्हणून प्रतिनियुक्तीवर आलेल्या प्रतिभा पाटील आणि आशा राऊत यांची शुक्रवारी बदली करण्यात आली. मुंबई येथे नगरपरिषद प्रशासन संचालनालय सहायक आयुक्त पदावर या दोन्ही अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने शुक्रवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. त्यामध्ये पुणे महापालिकेत उपायुक्त म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या आशा राऊत आणि प्रतिभा पाटील यांच्या नावांचा समावेश आहे. या बदल्यांमध्ये पुणे महापालिकेत तीन अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सहायक आयुक्त पदावर काम करणारे विजयकुमार थोरात यांची पुणे महापालिकेत उपायुक्तपदी, पीएमपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार यांना पुणे महापालिकेत सहायक आयुक्त पदावर नियुक्त करण्यात आले आहे. तर, पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रशासन अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या शीतल वाकडे यांची पुणे महापालिकेत प्रशासन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी हे आदेश काढले आहेत.