पुणे : महापालिकेच्या मिळकतकर विभागाला पहिल्या सव्वादोन महिन्यातच १४०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्यात यश आले आहे. एकरकमी मिळकतकर भरल्यास महापालिकेने पाच ते दहा टक्के सवलत जाहीर केली होती. याचा फायदा घेत आतापर्यंत ७ लाख ७५ हजार १४० मिळकतधारकांनी १ हजार ४११ कोटी रुपयांचा मिळकतकर महापालिकेच्या तिजोरीत जमा केला.
महापालिकेचा उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत म्हणून मिळकत कर विभागाकडे पाहिले जाते. चालू वर्षाच्या २०२५ – २६ च्या अंदाजपत्रकात मिळकतकर विभागाला ३२५० कोटी रुपयांचे उदिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी पहिल्या सव्वादोन महिन्यांमध्येच १४११ कोटी रुपयांचा महसूल जमा करण्यास मिळकतकर विभागाला यश आले. मिळकतकरात ४० टक्के सवलत मिळावी, यासाठी महापालिकेने नागरिकांकडून ‘पीटी-३’ अर्ज भरुन घेण्यास सुरुवात केली होती. या अर्जावर निर्णय न झाल्याने अनेक अर्ज प्रलंबित होते. त्यामुळे एक महिना उशीरा मिळकतकराची बिलांचे वाटप यंदाच्या वर्षी करण्यात आले.
सवलतीच्या दरात मिळकतकर भरण्याची मुदत ३० जूनपर्यंत होती. अखेरच्या दोन दिवसांमध्ये ऑनलाईलन यंत्रणा कोलमडल्याने नागरिकांना मिळकतकराचे बिल भरताना अडचणी येत होत्या. याबाबतच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन मिळकतकर विभागाने ७ जुलैपर्यंत सवलतीच्या दरात नागरिकांना मिळकतकर भरता येईल, असे जाहीर केले होते. याचा फायदा घेत सात दिवसात २०० कोटी रुपयांचा मिळकतकर महापालिकेकडे जमा करण्यात आला आहे. रात्री बारा वाजेपर्यंत नागरिकांना ऑनलाईनच्या माध्यमातून मिळकत कराचा भरणा करणे शक्य असल्याने उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता कर आकारणी प्रमुख अविनाश सपकाळ यांनी व्यक्त केली.
गेल्या वर्षी (२०२४ मध्ये) ७ जुलैपर्यंत ७ लाख ७८ हजार ५१६ नागरिकांनी १ हजार ४१५ कोटी ६५ लाख रुपयांचा मिळकत कर भरला होता. मिळकत करातील चाळीस टक्के सवलत, समाविष्ट गावांतील कर घेण्यास असलेली स्थगिती यानंतरही मिळकत कर विभागाने मागील वर्षी इतके उत्पन्न मिळविले आहे. मिळकतकराची थकबाकी वसुलीसाठी पथके नेमण्यात येणार असून अंदाजपत्रकात दिलेले उदिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.
मिळकत कर विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेले प्रयत्न आणि नागरिकांना सवलतीच्या दरात मिळकतकर भरता यावा, यासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सुविधांमुळे पहिल्या सव्वादोन महिन्यात १४०० कोटी रुपयांचे उदिष्ट गाठले आहे. – अविनाश सपकाळ, उपायुक्त, मिळकतकर विभाग