पुणे : पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शनिवारी नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता, तुळशीबाग, नरपतगिरी चौक, मॉडेल कॉलनी येथील दीप बंगला चौक येथे कारवाई करून अतिक्रमणे काढली.शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर, पदपथांवर छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी अतिक्रमणे करून दुकाने थाटली आहेत. राजकीय पक्षांच्या स्थानिक ‘माननीयां’चा पाठिंबा असल्याने अगदी बिनधास्तपणे पदपथांवर व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याचे पाहायला मिळते.
पदपथावर असलेल्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना चालण्यासाठी रस्ता राहत नाही, अशा तक्रारी नागरिकांकडून केल्या जात होत्या. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीदेखील शहरात वाढत असलेल्या अतिक्रमणांबाबत नाराजी व्यक्त करून कारवाई करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला केल्या आहेत.
नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर शिवाजीनगर, घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने अतिक्रमण कारवाई करण्यात आली. अतिक्रमण निरीक्षक सचिन उतळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली. प्रभाग क्रमांक १४, प्रभाग क्रमांक ७ व पुणे-मुंबई महामार्गावरदेखील कारवाई करून अनेक हातगाड्या आणि छोट्या व्यावसायिकांची दुकाने काढण्यात आली. दीप बंगला चौक, मंगळवार पेठ येथील जुना बाजार येथेदेखील कारवाई करण्यात आली. बाबू गेनू चौक व संपूर्ण तुळशीबाग परिसर येथे कारवाई करून अतिक्रमणे काढण्यात आली, अशी माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त संदीप खलाटे यांनी दिली.
शहरातील विविध भागांत महापालिकेच्या वतीने अतिक्रमण कारवाई सुरू आहे. सुटीच्या दिवशीही कारवाई सुरू राहणार आहे. शनिवारी नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता, तुळशीबाग, मॉडेल कॉलनी येथे कारवाई करण्यात आली. संदीप खलाटे, उपायुक्त अतिक्रमण विभाग