पुणे : पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने कोंढवा परिसरात झालेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच ठेवली आहे. या भागात अनेक बेकायदा बांधकामे करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाने कारवाईचा वेग अधिक गतीने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.महापालिकेच्या विशेष पथकाने सोमवारी कोंढवा खुर्द आणि कोंढवा बुद्रुक परिसरात कारवाई केली. या भागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत महापालिकेच्या पथकाने सुमारे पाच हजार ६०० चौरस फूट आरसीसी बांधकाम पाडले. या कारवाईमध्ये दोन बहुमजली इमारती देखील पाडण्यात आल्या अशी माहिती बांधकाम विभागाने दिली.
कोंढवा खुर्द आणि कोंढवा बुद्रुक परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. या बाबत अनेकांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाने कडक भूमिका घेत. बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कोंढवा बुद्रुक तसेच कोंढवा खुर्द या भागात छोट्या जागांमध्ये पुणे महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात बांधकामे केली जात आहेत.
ही बांधकामे नागरिकांना खोटी कागदपत्रे दाखवून विकली जात आहे. त्यामुळे अनेकांची फसवणूक झाल्याच्या घटना देखील उघडकीस आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या बांधकाम विभागाने या भागाची पाहणी करून बेकायदा पद्धतीने उभारण्यात आलेल्या बांधकामांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.कोंढवा बुद्रुक येथील लक्ष्मी नगर गली नं. ८, सर्वे नं. ३ येथे असलेल्या तीन मजली इमारतीवर आणि कोंढवा खुर्द येथील मलिक नगर व साईबाबा नगर (सर्वे नं. ६२) येथील दोन मजल्यांच्या दोन इमारतींवर कारवाई करून सोमवारी त्या पाडण्यात आल्या. या करवाईमध्ये महापालिकेच्या विशेष पथकात ६ बिगारी, ५ पोलीस कर्मचारी, १ जेसीबी, ४ ब्रेकर, २ गॅस कटर, ५ कनिष्ठ अभियंता आणि २ उपअभियंता सहभागी झाले होते.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कारवाईनंतर या इमारती धोकादायक अवस्थेत असल्याने त्यांचा वापर करू नये. अलीकडेच शहरातील विविध भागात अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई सुरू केली असून, नागरिकांनी फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी अधिकृत परवानगी घेतलेल्या प्रकल्पांमधूनच घर खरेदी करण्याचे आवाहनही अधिकाऱ्यांनी केले आहे.
महापालिकेच्या बांधकाम विभागाने कारवाई करत पाडलेली इमारत पुन्हा त्याच पद्धतीने बांधली जाणार नाही याकडे लक्ष दिले जात आहे. इमारत पाडताना प्रत्येक मजल्यावर टाकलेले स्लॅब तोडले जात आहेत. या कारवाईमुळे या इमारती धोकादायक झाल्या असून त्यामध्ये राहण्यास जाण्याचे नागरिकांनी टाळावे, असेही बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.