पुणे : महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता घटत असल्याने यामध्ये सुधारणा करण्याासाठी शिक्षकांवर जबाबदारी निश्चित करण्याचा विचार महापालिकेने सुरू केला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यावर काही हजार रुपयांचा निधी महापालिका खर्च करत असताना गुणवत्ता ढासळत असल्याचे समोर आल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

शिक्षकांसाठी प्रभागनिहाय तसेच परिमंडळनिहाय शिक्षण परिषदांचे आयोजन केले जाणार आहे. महापालिकेच्या शाळांध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळत आहे. याबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी बैठक घेतली.

यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांपैकी ६० टक्के विद्यार्थ्यांना भागाकारासाठी मूलभूत गणिती क्रियादेखील करता येत नाही. महापालिका शाळांना सर्व सुविधा, शिक्षक पुरवित असतानाही गुणवत्ता ढासळत असल्याने महापालिकेने ही बाब गांभीर्याने घेतली आहे.

शाळेतील शिक्षकांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. यासाठी प्रभागस्तरावर तसेच परिमंडळाच्या स्तरावर शिक्षण परिषद आयोजित केली जाणार आहे. यामध्ये शिक्षकांशी चर्चा करण्यात येणार आहे. पालिका सर्व आवश्यक सुविधा देत असतानाही असे प्रकार का घडत आहेत? मुलांना शिक्षणात काय अडचणी येत आहेत? शिक्षकांना काय अडचणी आहेत? यावर या परिषदेत सविस्तर चर्चा होणार आहे.

परिमंडळाच्या परिषदेत अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. सहभागी होऊन शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. याबरोबरच पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन, स्वच्छ व सुंदर शाळा, चांगल्या शिक्षकांच्या सर्वोत्तम कार्यपद्धती यावर चर्चा तसेच सादरीकरण होणार आहे.

अध्ययन निष्पत्ती परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना शिकवलेल्या गोष्टी कितपत समजल्या आहेत, याची पडताळणी केली जाते. मात्र, यात सर्व शाळा आपापल्या विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन अहवाल देतात. मात्र, असर च्या अहवालानंतर आम्ही अध्ययन निष्पत्तीच्या पेपरची बाहेरील शिक्षकांकडून तपासणी केली असता गुण संपादनात फरक असल्याचे समोर आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी म्हणाले, महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी शाळांना सर्व सुविधा पुरविल्या जातात. चांगल्या, गुणवंत शिक्षकांचीही नियुक्ती केली आहे. असे असताना विद्यार्थ्यांना मूलभूत शिक्षणातील गोष्टी येत नसतील, तर हा प्रकार गांभीर्याने घ्यावा लागणार आहे.