पुणे : खासगी रुग्णालयांनी देयकासाठी रुग्णांचे मृतदेह अडवून ठेवल्याच्या दोन घटना नुकत्याच घडल्या होत्या. याची महापालिकेच्या आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. आरोग्य विभागाने शहरातील सर्व रुग्णालयांना पत्र पाठविले असून, कोणत्याही कारणास्तव रुग्णाचा मृतदेह अडवून ठेवू नये, अशी सक्त ताकीद दिली आहे. याचबरोबर असा प्रकार आढळल्यास कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

शहरातील दोन खासगी रुग्णालयांनी देयकासाठी रुग्णांचे मृतदेह अडवून ठेवल्याच्या घटना घडल्या होत्या. या दोन्ही रुग्णालयांना महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोटीस बजावली होती. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी आरोग्य विभागाने पावले उचलली आहेत. आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना पत्र पाठविले आहे. त्यात बॉम्बे नर्सिंग होम कायदा १९४९ आणि महाराष्ट्र नर्सिंग होम कायदा २०२१ चे काटेकोर पालन करण्याचे निर्देश खासगी रुग्णालयांना देण्यात आले आहेत.

आरोग्य विभागाने रुग्णालयांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, खासगी रुग्णालयांनी रुग्णांसोबत सौजन्यपूर्ण वर्तन करणे आवश्यक आहे. गंभीर रुग्णांच्या आर्थिक स्थितीचा विचार न करता त्यांना प्राधान्याने आरोग्य सेवा देणे अपेक्षित आहे. एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास आवश्यकतेनुसार न्यायवैद्यक प्रक्रिया पूर्ण करून नातेवाइकांच्या ताब्यात मृतदेह द्यावा. कोणत्याही परिस्थितीत देयक भरले नाही म्हणून अथवा अन्य कारणास्तव रुग्णाचा मृतदेह रुग्णालयाला रोखून धरता येणार नाही. या सूचनांचे काटेकोर पालन रुग्णालयांनी करावे.

तज्ज्ञांचे मत काय?

महाराष्ट्र नर्सिंग होम नोंदणी कायद्यातील कलम ११ एलनुसार कोणत्याही रुग्णालयाला कोणत्याही कारणास्तव रुग्णाचा मृतदेह अडविता येत नाही. या कायद्यात पैशांअभावी मृतदेह अडवून ठेवू नये, अशी स्पष्ट तरतूद आहे. याचेच पालन सध्या रुग्णालयांकडून होताना दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारने अशा रुग्णालयांच्या व्यवस्थापनावर कठोर कारवाई करावी. याचबरोबर प्रत्येक शहरात वैद्यकीय तक्रार निवारण कक्ष असणे आवश्यक आहे. त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवून त्या माध्यमातून आलेल्या तक्रारींचे निवारण सरकारी यंत्रणेने करणे बंधनकारक आहे. ते सध्या कोठेही होताना दिसत नाही, असे मत जनस्वास्थ्य अभियानाचे संयोजक डॉ. अभय शुक्ला यांनी व्यक्त केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासगी रुग्णालयांनी पैशांअभावी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यास नकार दिल्याच्या तक्रारी आल्या होत्या. याप्रकरणी दोन रुग्णालयांना नोटीस बजाविण्यात आली होती. पैशांअभावी रुग्णाचा मृतदेह अडवून ठेवणे चुकीचे आहे. असा प्रकार आढळल्यास रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. – डॉ. नीना बोराडे, आरोग्य प्रमुख, महापालिका